६ जुलै २०२३ या दिवशी गोस्वामी तुलसीदास यांची ४०० वी जयंती आहे. त्या निमित्ताने…
संत तुलसीदास प्रभु रामाचे भजन-कीर्तन करण्यात मग्न असे. काशी क्षेत्रात त्यांची कीर्ती पसरली. लोकांनी संत तुलसीदासांना मठ बांधून दिला, धर्मकार्यासाठी श्रीमंतांनी त्यांना द्रव्य आणून दिले. एकदा ब्राह्मणांसह संत तुलसीदास भोजनाला बसत होते. इतक्यात ‘जय सीता-राम’ असे म्हणत तेथे ब्राह्मण भिक्षा मागण्यास आला. संत तुलसीदासांनी त्याला पंक्तीस बसवले. त्यामुळे सर्व ब्राह्मण उठून जाऊ लागले. त्यांना विचारताच ते म्हणाले, ‘‘याच्या हातून ब्रह्महत्या झाली आहे. अशा पापी माणसाच्या पंगतीस आम्ही बसणार नाही.’’ ‘‘रामनामस्मरणाने हा पुण्यवान झाला आहे. याचे सर्व पाप नाहीसे झाले आहे. नामाने भस्म होत नाही, असे पातकच नाही, असे श्रीकृष्णाने उद्धवास सांगितले आहे’’, असे संत तुलसीदास म्हणाले. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, ‘‘तुम्ही शिवमंदिरातील नंदीकडून नैवेद्य भक्षण करवून दाखवा, म्हणजे याचे पातक गेले, असे आम्ही समजू !’’ ब्राह्मणांचे भाषण ऐकून संत तुलसीदास पत्रावळीत नैवेद्य घेऊन शिवमंदिरात गेले. नंदीसमोर नैवेद्य ठेवून ते म्हणाले, ‘‘देवा, समुद्रमंथनाच्या वेळी तू विषभक्षण केले, त्या वेळी तुझ्या सर्वांगाची झालेली आग ‘राम’नाम उच्चारताच शांत झाली. त्याच ‘रामा’चे नाव ब्राह्मणाने घेतल्याने हा ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाला नाही का ? ती साक्ष दाखवण्यासाठी पाषाणाच्या नंदीने सर्वांसमक्ष नैवेद्य भक्षण करावा, अशी प्रार्थना आहे.’’ नंदीने नैवेद्य सर्वांसमक्ष खाल्ला. हा चमत्कार पाहून सर्वांनी संत तुलसीदासांच्या चरणांवर लोटांगण घातले. (साभार : ‘बालसंस्कार’ संकेतस्थळ)