भारतातील आदर्शवत् ठरणारी गुरु-शिष्य परंपरा !

गुरु-शिष्य परंपरेचे अलौकिकत्व जाणा !

एकदा एका विदेशी व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना प्रश्‍न विचारला, ‘‘भारताचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास कसे कराल ?’’ तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी सांगितले, ‘‘गुरु-शिष्य परंपरा !’’ गुरु-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून इतिहासापर्यंत पहायला मिळतात, उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि श्रीकृष्ण इत्यादी. यांच्या जोडीला चंद्रगुप्त मौर्य-आर्य चाणक्य यांचे उदाहरणही आहे. चंद्रगुप्ताला आर्य चाणक्यांनी गुरु म्हणून मार्गदर्शन केले आणि एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ पातशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपल्यासमोरील आदर्श आहेत.

श्री. सत्यकाम कणगलेकर

गुरु-शिष्य परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी भारत हिंदु राष्ट्र होणे आवश्यक !

गुरु-शिष्य परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आज आली आहे. समाजामध्ये काही प्रमाणात राष्ट्राविषयी अभिमान असला, तरी धर्मप्रेम असणेही तितकेच आवश्यक आहे. धर्माधिष्ठित राज्यप्रणाली असली, तरच समाजामध्ये एकोपा, सामंजस्यादी दैवी गुणांचा विकास आणि आचरण होते. लोकांमध्ये धर्मप्रेम रुजवण्याचे कार्य गुरु (संत) करत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी आदी अनेक संत होऊन गेले. त्यांनी त्यांच्या सात्त्विक वाणीने लोकांमध्ये धर्मप्रेम, पर्यायाने राष्ट्रप्रेम जागृत केले. धर्माधारित राष्ट्र स्थापले, तर ते कित्येक शतके टिकून रहाते आणि त्याच्या भौगोलिक मर्यादाही मोठ्या अन् व्यापक असतात. श्रीरामाने स्थापलेले राज्य पुढील सहस्रो वर्षे टिकले. त्यांनी स्थापलेल्या राज्याच्या सीमा केवळ आताच्या भौगोलिक भारतापुरत्याच नव्हे, तर आताच्या अफगाणिस्तान, इराण येथपर्यंत आणि तिबेटपासून दक्षिणेत इंडोनेशियापर्यंत होत्या. इतिहास पहातांना लक्षात येते की, चंद्रगुप्त मौर्य यांनीही आर्य चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या सीमा भारतवर्षासह अफगाणिस्तानपर्यंत होत्या. मौर्य साम्राज्य हे विश्‍वातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्यासमोरील या आदर्शांतून गुरु-शिष्य परंपरेची महानता लक्षात येते. गुरु शिष्याच्या केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर व्यावहारिक उन्नतीचीही काळजी घेतात. त्यामुळे राष्ट्रउभारणीसाठी  गुरु-शिष्य परंपराच आवश्यक आहे. गुरु-शिष्य परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत पुनःश्‍च हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक आहे.

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


गुरु-शिष्य परंपरेची थोरवी दर्शवणारी उदाहरणे !

धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची कठोर परीक्षा घेणारे समर्थ रामदासस्वामी !

छत्रपती शिवाजीराजे प्रत्येक गुरुवारी समर्थांचे दर्शन घेतल्याविना भोजन करत नसत. एके दिवशी राजे समर्थांच्या दर्शनार्थ निघाले असता महाबळेश्‍वरच्या रानात समर्थ असल्याचे त्यांना समजले. त्यांनी समर्थांचा पुष्कळ शोध केला; पण ते सापडले नाही. सायंकाळी काही सेवकांसह ते मशाली घेऊन निघाले. इतक्यात एका गुहेतून जोरजोरात विव्हळण्याचा स्वर ऐकू आला. तो स्वर समर्थांचाच वाटल्याने ते त्या गुहेत शिरले.

शिवराय (समर्थांना वंदन करून) : महाराज, आपल्याला काय होत आहे ?

समर्थ : शिवबा, पोटशुळाने भयंकर व्यथा होत आहे. या दुखण्यापासून जगणार, असे मला वाटत नाही.

राजे : महाराज, असे म्हणू नका. आपल्यापासून तर आम्हासारख्यांना धीर मिळायचा. आपली आज्ञा व्हावी, म्हणजे मी लगेच चांगले वैद्य आणतो. औषधोपचार केल्यावर तुम्हाला लगेच बरे वाटू लागेल.

समर्थ : शिवबा, हे काही नेहमीच्या दुखण्यापैकी दुखणे नसून हा मोठा असाध्य रोग आहे. यासाठी वैद्याचा काही एक उपयोग होणार नाही. यावर रामबाण औषध म्हणजे केवळ वाघिणीचे दूध होय; पण आपला जीव धोक्यात घालून ते मला आणून देणार तरी कोण ?

राजे : आपल्या कृपाशीर्वादाने मी हे काम करू शकेन. (असे म्हणून राजे समर्थांचा तांब्या घेऊन निघाले.)

समर्थ : शिवबा, हे काय ? तू निघालास ? नको नको. मी जोगड्या आहे. मला ना बायको, ना पोर. मी मेलो, तर रडणारेसुद्धा कोणी नाही. तू आज सहस्रो लोकांना हवाहवासा वाटणारा; म्हणून हे काम तुझ्यासारख्याने करायचे नाही.

राजे : महाराज, हा देह कधी ना कधी तरी नाहीसा व्हायचाच आहे ना ? सद्गुरुसेवेत खर्ची पडला, तर याचे सार्थक तरी होईल.

राजे रानातून जातांना त्यांना वाघाची दोन पिल्ले जाळीतून बाहेर पडलेली दिसली. वाघिणीची वाट पहात ते तेथेच बसले. थोड्या वेळाने वाघीण त्यांच्या दृष्टीस पडली. राजांनी तिला वंदन करून औषधाकरीता गुरूंना दूध देण्यासाठी तिची प्रार्थना केली आणि ते म्हणाले, ‘‘माझ्या देहावर जर तुझे मन आसक्त झाले असेल, तर तुझे दूध गुरूंना देऊन मी लगेच परत येतो.’’ त्या क्षणी वाघिणीचा क्रूर स्वभाव नाहीसा होऊन ती सभ्य गायीप्रमाणे उभी राहिली. राजांनी लगेच तिचे दूध काढले. इतक्यात तेथे ‘जय जय रघुवीर समर्थ’, असे म्हणून समर्थ आले. त्यांनी शिवाजींची पाठ थोपटून, ‘शिवबा, तू खरोखरच धन्य आहेस !’ असे उद्गार काढले.

गुर्वाज्ञापालनासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा शिष्य आरुणी !

धौम्यऋषींच्या आश्रमात आरुणी नावाचा शिष्य होता. एके दिवशी मोठा पाऊस पडल्याने आश्रमाच्या शेताचा बांध फुटून शेत वाहून जाऊ नये; म्हणून धौम्यऋषींनी शिष्यांना सांगितले, जा ! काळजी घ्या. शेताचा बांध फुटू देऊ नका. आरुणी आणि काही शिष्य शेतातील बांधाजवळ आले. फुटलेला बांध त्या सर्वांनी नीट करावा अन् पावसाच्या पाण्याने पुन्हा तो फुटून जावा, असेच घडत होते. रात्र झाली. सर्व शिष्य कंटाळून परत गेले. दिवसभर कष्ट केल्यामुळे थकलेले सर्व शिष्य गाढ झोपी गेले. सकाळी पाऊस थांबला, तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की, आरुणी आश्रमात दिसत नाही. धौम्यऋषी शेतात येऊन आरुणीला हाका मारू लागले. बांधाच्या दिशेकडून उत्तर आले, ‘‘गुरुजी, मी येथे आहे !’’ पहातात तर काय ? घातलेला बांध टिकेना; म्हणून स्वत: आरुणीच तेथे आडवा पडलेला त्यांना दिसला ! गुरुजींनी त्याला उठवले आणि प्रेमाने जवळ घेतले. आरुणीही त्यांचा लाडका शिष्य झाला !

आज्ञाधारक उपमन्यू आणि त्याची परीक्षा घेऊन त्याला आवडता शिष्य बनवणारे धौम्यऋषी !

धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी ‘मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा’, असे त्याला सांगितले. उपमन्यू तसे करू लागला. काही काळाने धौम्यऋषींनी त्याला मिळालेली संपूर्ण भिक्षा गुरूंना अर्पण करण्यास सांगितली. उपमन्यूने तसे केले. त्याची प्रकृती उत्तमच असल्याचे पाहून धौम्यऋषींनी त्याला विचारले, ‘‘तू काय सेवन करतोस ?’’ त्याने सांगितले, ‘‘मी रानात गायीचे दूध पितो.’’ धौम्यऋषी म्हणाले, ‘‘यामुळे दूध उष्टे होते. ते पिऊ नकोस.’’ धौम्यऋषींची ही आज्ञाही उपमन्यूने आनंदाने मान्य केली. दुसऱ्या दिवशी गायी घेऊन रानात गेल्यावर भूक लागल्याने त्याने रुईच्या झाडाचा चीक काढून खाल्ला. तो चीक डोळ्यांत उडाल्याने त्याला अंधत्व आले. सायंकाळी आश्रमाकडे परततांना तो विहिरीत पडला. धौम्यऋषी त्याचा शोध घेत रानात आले. धौम्यऋषींनी त्याला विहिरीतून वर काढले. त्याच्या तोंडून सर्व वृत्तांत ऐकल्यावर धौम्यऋषी प्रसन्न झाले. गुरूंच्या सांगण्यावरून उपमन्यूने देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांना प्रार्थना केली. अश्विनीकुमारांनी त्याला दृष्टी दिली आणि ‘महाज्ञानी होशील’, असा आशीर्वादही दिला ! केवळ गुरूंचे आज्ञापालन केल्याने तो त्यांचा आवडता शिष्य झाला !

(संदर्भ : balsanskar.com)

भगवान परशुराम-भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य !

भगवान शिवाने परशुरामांना शस्त्रास्त्रविद्या शिकवली आणि परशू दिला. परशुराम धनुर्विद्येत निष्णात होते. परशुरामांनी भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य यांना धनुर्विद्या शिकवली. द्रोणाचार्यांनी ती पुढे कर्ण आणि अर्जुन यांना शिकवली.