पंढरीच्या वाटेवर दिंड्यांना शिधा पुरवणारा मिलिंद चवंडके हा मुलुखावेगळा प्रवचनकार ! – ह.भ.प. सतीश महाराज निमसे

वारकर्‍यांना शिक्षावाटप करतांना  श्री. मिलिंद चवंडके

नगर – आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या दिंड्यांना अनेकजण अन्नदान करतात; पण दिंड्यांमागे थेट टेंभूर्णीपर्यंत येऊन किराणा साहित्यासह उपवासासाठी फराळाचे विविध प्रकार अगदी दूधही पुरवून वारकर्‍यांशी समरस होणारे मिलिंद चवंडके हे महाराष्ट्र राज्यातील मुलूखावेगळे प्रवचनकार आहेत, असे कौतुकोद्गार ह.भ.प. सतीश महाराज निमसे यांनी काढले. दरवर्षीप्रमाणे मिलिंद चवंडके हे पंढरीच्या वाटेवरील दिंड्यांना शिधा देण्यास पोचले असता ते बोलत होते.

नगर शहरामधील सर्वश्री नंदलाल मणियार, धनेश बोगावत, प्रमोद (पिटूशेठ) गांधी, वैद्य विलास जाधव, आधुनिक वैद्य डॉ. रवींद्र भोसले, समीर आणि सागर उपाध्ये, अशोक केदारी, हेमंत दंडवते, प्रविण सोनी, राजू परदेशी, रणजित रासकर, शशांक शहाणे, सौ. समता शहाणे, सौ. ज्योती दांडेकर या सर्वांनी दिंड्यांच्या महाअन्नदान सेवेसाठी आवश्यक ते साहित्य तातडीने उपलब्ध करून दिले. सचिन खताडे यांनी वाहनव्यवस्था केली. या सर्वांची साथ मिळाल्यामुळेच आपल्या सर्वांच्या हृदयस्थ पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद मिळाला, असे श्री. मिलिंद चवंडके यांनी नम्रपणे सांगितले.

ह.भ.प. निमसे महाराज पुढे म्हणाले, ‘‘दिंड्या आपल्या गावात, आपल्या घराच्या अंगणात आल्यावर अन्नदान करणारे भाविक अनेक आहेत; पण मार्गस्थ झालेल्या दिंड्यांकडील शिधा संपत आला असतांना अगदी गरजेच्या वेळी दिंड्यांच्या भेटी घेऊन आवश्यक तो शिधा देण्याची निरपेक्ष सेवा परमश्रद्धेने करणारे प्रवचनकार मिलिंद चवंडके हे एकमेव आहेत. त्यांच्या सेवेचे हे १८ वे वर्ष आहे. पांडुरंग त्यांना भरभरून आयुष्य देवो आणि ही सेवा अशीच जोमात चालत राहो.’’ ह.भ.प. निमसे महाराज यांनी असे म्हणताच उपस्थित सर्व दिंडीकर्‍यांनी उच्चस्वरात हरिनामाचा गजर केला. अवघे वातावरण विठूमय झाले.