सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छानिवृत्तीवरून आरोप-प्रत्यारोप !
छत्रपती संभाजीनगर – येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतर राजकीय वातावरण तापत आहे. सरकारला प्रामाणिक अधिकारी नकोत. केंद्रेकर यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला, तर स्वेच्छा निवृत्ती हा त्यांचा वैयक्तिक विषय असून त्याचा सरकारशी संबंध नाही. विरोधी पक्षाने राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहे.
केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर त्याचे पडसाद महसूल आणि राजकीय क्षेत्रांत उमटत आहेत. महसूल विभाग आणि मराठवाडा येथील अधिकार्यांना स्वेच्छा निवृत्तीविषयी आश्चर्य वाटत आहे. दीड-दोन वर्षे सेवा बाकी असतांना निवृत्ती घ्यायला नको होती, अशी भूमिकाही अधिकारी खासगीत मांडत आहेत.
अंबादास दानवे म्हणाले की, या संदर्भात माझा केंद्रेकर यांच्याशी संपर्क झालेला नाही; मात्र माझे मत आहे की, त्यांनी शेतकर्यांच्या केलेल्या शिफारशी सरकारला पचनी पडलेल्या नाहीत. प्रत्येक शेतकर्याला एकरी १० सहस्र रुपये साहाय्याची शिफारस त्यांनी केली होती.