जळगावच्या वसतीगृहाच्या महिला गृहपाल सुट्टीवर गेल्याने पुरुष शिपायाकडे दायित्व !

जळगाव – येथील सिंधी वसाहत परिसरातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या महिला गृहपाल यांनी पुरुष शिपायावर वसतीगृहाचे दायित्व सोपवून त्या २ दिवसांच्या सुट्टीवर गेल्या आहेत. मुंबईतील सावित्रीदेवी फुले मुलींच्या शासकीय वसतीगृहात जून मासात १८ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकानेच तिचा खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर महिला वसतीगृहात पुरुष कर्मचार्‍यांना पूर्ण बंदी करणारा आदेश जारी करण्यात आला आहे. (आदेश दिलेला असतांना जळगाव येथे पुरुष शिपायाकडे मुलींचे दायित्व सोपवले जाणे हे चिंताजनक आहे ! – संपादक)

एका बातमीच्या निमित्ताने वसतीगृहातील मुलींच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी काही जण तेथे गेल्यावर हा प्रकार समोर आला. त्या वेळी त्या शिपायासमवेत आणखी एक पुरुष गप्पा मारतांना आढळला.

‘सध्या येथील वसतीगृहात १८ तरुण मुली रहात आहेत. पुरुष शिपाई जरी दायित्व सांभाळत असला, तरी मुलींना येथे धोका नाही’, असे समाजकल्याण आयुक्तांनी म्हटले आहे. वसतीगृहाच्या गृहपाल वैशाली पाटील म्हणाल्या, ‘‘माझ्या आईची प्रकृती बरी नसल्याने मी मुंबईला आले आहे. वसतीगृहातील शिपाई विद्यार्थिनींवर लक्ष ठेवून असतो. कुणीही आले, तरी त्याची माहिती तो मला कळवतो.’’

संपादकीय भूमिका

  • महिला वसतीगृहात पुरुष कर्मचार्‍यांना बंदीचा आदेश असतांनाही त्याकडे कानाडोळा करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !
  • महिला गृहपाल २ दिवस नसतांना त्याच कालावधीत मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ?