परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी नकारात्‍मक परिस्‍थितीचे रूपांतर सकारात्‍मकतेत केल्‍याबद्दल कृतज्ञताभावात असणार्‍या मदुराई येथील श्रीमती कलैवाणी (वय ४८ वर्षे) !

श्रीमती कलैवाणी

१. शारीरिक व्‍याधी आणि पतीचे निधन यांमुळे निराशा येणे अन् सनातन संस्‍थेच्‍या सत्‍संगाला उपस्‍थित राहू लागल्‍यानंतर हळूहळू मानसिक बळ मिळून सामान्‍य जीवन जगण्‍यास साहाय्‍य होणे

‘मी मदुराई येथे ‘श्रीराम हाऊसिंग फायनान्‍स कंपनी’मध्‍ये ‘क्रेडिट मॅनेजर’ या पदावर कार्यरत आहे. माझी दिनचर्या व्‍यस्‍ततापूर्ण असते. पूर्वी शारीरिक व्‍याधींमुळे मी अधिक चालू – फिरू शकत नव्‍हते. मला प्रतिदिन कार्यालयात भाडोत्री वाहनाने (टॅक्‍सीने) जावे लागत असल्‍यामुळे प्रतिमास १० – १२ सहस्र रुपये व्‍यय होत होते. त्‍यासाठी ‘मला माझी दुचाकी चालवता येऊ दे आणि पैशांचा व्‍यय अल्‍प होऊ दे’, अशी प्रार्थना मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना नियमितपणे करत होते. दोन वर्षांपूर्वी मेंदूत रक्‍तस्राव (ब्रेन हॅमरेज) झाल्‍याने माझ्‍या पतीचेे निधन झाले. तेव्‍हा मला पुष्‍कळ नैराश्‍य आले होते आणि ते बर्‍याच काळापर्यंत टिकून होते. मी सनातन संस्‍थेच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या सत्‍संगाला उपस्‍थित राहू लागल्‍यानंतर हळूहळू मला मानसिक बळ मिळाले आणि वरील अडचणी दूर होऊन मला सामान्‍य जीवन जगण्‍यास साहाय्‍यही झाले.

 २. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना ‘मला सेवा करता येऊ दे’, अशी प्रार्थना करणे

एका सत्‍संगात सौ. सुगंधी यांनी आम्‍हाला गुरुपौर्णिमेच्‍या सेवांचे महत्त्व सांगितले. तेव्‍हा ‘मला इतरांप्रमाणे सेवेसाठी वेळ देता येत नाही’, याची मला खंत वाटली. त्‍यामुळे मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना ‘मला सेवा करता येऊ दे’, अशी प्रार्थना केली.

३. दोन दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला यांमुळे घसा पुष्‍कळ दुखणे, उपचारासाठी औषधालयातून औषधे आणणे आणि पू. (सौ.) उमाक्‍कांच्‍या सत्‍संगानंतर घशातील वेदना औषध न घेताच थांबल्‍याचे लक्षात येणे

१.७.२०२१ या दिवशी मला पुष्‍कळ ताप आला, तसेच सर्दी आणि खोकलाही होता. मला ताप असूनही माझ्‍या वरिष्‍ठांनी मला कार्यालयात उपस्‍थित रहाण्‍यास सांगितल्‍यामुळे मी कामावर गेले. दुसर्‍या दिवशीसुद्धा ताप असतांना मी कार्यालयात गेले. ३.७.२०२१ या दिवशी गुरुपौर्णिमेच्‍या सेवांसंदर्भात पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्‍यासमवेत आमचा ‘ऑनलाईन’ सत्‍संग होता. त्‍या दिवशी सर्दीचा त्रास वाढल्‍याने माझा घसा पुष्‍कळ दुखत होता. त्‍यामुळे उपचारासाठी मी आधुनिक वैद्यांकडे गेलेे; परंतु तिथे रुग्‍णांची पुष्‍कळ दाटी (गर्दी) असल्‍याने मी तशीच परत आले. येतांना मी औषधालयातून औषधे घेऊन आले. घरी आल्‍यावर लगेचच मी पू. (सौ.) उमाक्‍कांसमवेत असलेल्‍या सत्‍संगाला उपस्‍थित राहिले. सत्‍संगात पू. (सौ.) उमाक्‍कांनी पू. (सौ.) संगीता पाटील यांनी केलेल्‍या गुरुपौर्णिमेच्‍या सेवेसंदर्भात आम्‍हाला सांगितले. ते ऐकून मी पुष्‍कळ प्रभावित झाले. ‘मलासुद्धा सेवा करण्‍याची संधी द्यावी’, अशी प्रार्थना मी गुरुदेवांना केली. सत्‍संग संपल्‍यावर माझ्‍या लक्षात आले, ‘माझ्‍या घशातील वेदना औषध न घेताच थांबल्‍या आहेत.’

४. ‘कोरोना’चा संसर्ग झाल्‍यावर एकीकडे चिंता, तर दुसरीकडे देवाने सेवा करण्‍याची संधी उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल आनंद होणे आणि विलगीकरणाच्‍या कालावधीत गुरुपौर्णिमेच्‍या संदर्भातील सेवा पूर्ण करणे

दुसर्‍या दिवशी मला ‘पी.सी.आर्.’ चाचणी (कोरोनाचा संसर्ग झाला आहे का ? ते पडताळण्‍यासाठीची चाचणी) करवून घेण्‍याची सूचना कार्यालयातून मिळाली. मी ती चाचणी करून घरी आले. दुसर्‍या दिवशी, म्‍हणजेच ६.७.२०२१ ला मला ‘कोरोना’चा संसर्ग झाल्‍याचा अहवाल आला. त्‍यामुळे मला १४ दिवस विश्रांती घेण्‍यास आणि घरी राहून काम करण्‍यास कार्यालयातून सांगण्‍यात आले. एकीकडे  ‘कोरोना’चा संसर्ग झाल्‍यामुळे मी चिंतीत झाले होते, तर दुसरीकडे देवाने मला सेवा करण्‍याची संधी उपलब्‍ध करून दिल्‍याविषयी मला आनंद होत होता.

पू. (सौ.) उमाक्‍कांच्‍या मार्गदर्शनाप्रमाणे मी ‘कोरोना’ प्रतिबंधक नामजप चालू केला आणि गुरुपौर्णिमेच्‍या संदर्भातील सेवा मनापासून करू लागले. विलगीकरणाच्‍या कालावधीत मी त्‍या सेवा पूर्ण केल्‍या.

५. चौदा दिवसांच्‍या विलगीकरणानंतर अकस्‍मात् तीव्र स्‍वरूपाचा कोरडा खोकला येणे, त्‍यासाठी आधुनिक वैद्यांना भेटल्‍यावर त्‍यांनी आणखी प्रतिजैविके देणे आणि त्‍यानंतर कोणत्‍याही अडथळ्‍याविना चालता येऊ लागल्‍यावर गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे

मला ‘कोरोना’ची सौम्‍य लक्षणे होती. त्‍यामुळे मी विलगीकरणात राहून आधुनिक वैद्या असलेल्‍या माझ्‍या मैत्रिणीचा समुपदेश घेतला. त्‍यानुसार मी प्रतिजैविक (अँटिबायोटिक्‍स) आणि अन्‍य काही औषधे घेतली. १४ दिवसांनंतर मला अकस्‍मात् तीव्र स्‍वरूपाचा कोरडा खोकला येऊ लागला. त्‍यामुळे माझ्‍या मैत्रिणीने तिच्‍या ओळखीच्‍या अन्‍य एका आधुनिक वैद्यांना भेटण्‍यास आणि त्‍यांच्‍या समुपदेशानुसार रुग्‍णालयात भरती होण्‍यास सांगितले. २०.७.२०२१ या दिवशी मी मैत्रिणीने सांगितलेल्‍या त्‍या आधुनिक वैद्यांना भेटले. त्‍यांनी मला आणखी प्रतिजैविके देऊन ‘रुग्‍णालयात भरती होण्‍याची आवश्‍यकता नाही’, असे सांगितले. मी घरी आल्‍यावर ती औषधे नियमितपणे घेऊ लागले. त्‍यानंतर मला कोणत्‍याही अडथळ्‍याविना चालता येऊ लागले. ही माझ्‍यासाठी आयुष्‍यातील सर्वोत्तम अनुभूती होती. (पूर्वी शारीरिक व्‍याधींमुळे मी अधिक चालू – फिरू शकत नव्‍हते.)

६. गुरुदेवांच्‍या कृपेने नकारात्‍मक परिस्‍थितीचे रूपांतर सकारात्‍मकतेत होणे

गुरुदेवांच्‍या कृपेने आता मी स्‍वतः दुचाकी चालवू शकते. त्‍यांनी माझ्‍या नकारात्‍मक परिस्‍थितीचे रूपांतर सकारात्‍मकतेत केले, तसेच कोणत्‍याही प्रकारच्‍या कार्यालयीन अडचणीविना गुरुदेवांनी माझ्‍याकडून गुरुपौर्णिमेची सेवाही करवून घेतली. त्‍यासाठी मी त्‍यांच्‍या चरणी केवळ कृतज्ञताच व्‍यक्‍त करू शकते. आता प्रत्‍येक क्षणी मला गुरुदेवांचा कृपाशीर्वाद आणि मार्गदर्शन अनुभवायला मिळत आहे. पूर्वी मला दुचाकीने कार्यालयात पोचण्‍यासाठी ४५ मिनिटे लागत होती; परंतु त्‍यांच्‍याच कृपेमुळे शासनाने एका नवीन बांधलेल्‍या मार्गाचे उद़्‍घाटन केल्‍याने आता त्‍यासाठी मला केवळ २० मिनिटेच लागतात.

मला धन्‍य झाल्‍यासारखे वाटत आहे. साधना करण्‍यास इतरांना प्रेरणा मिळावी, तसेच देव आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावरील त्‍यांची श्रद्धा वृद्धिंगत व्‍हावी, यासाठी मी ही अनुभूती लिहून देत आहे.’

– श्रीमती कलैवाणी व्‍ही., मदुराई, तमिळनाडू. (१४.९.२०२१ )