‘गायक गायनाद्वारे देवाला आळवतो. नृत्यकलाकार नृत्याद्वारे देवासाठी नृत्य करून त्याचा भाव व्यक्त करू शकतो, तर कलाकार ‘अभिनया’द्वारे प्रत्यक्ष ईश्वरस्वरूप होऊ शकतो’, असे म्हणतात. इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतात. वर्ष १९३६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संत तुकाराम’ चित्रपटातील श्री. विष्णुपंत पागनीस यांची संत तुकारामांची भूमिका अजरामर झाली. रामकृष्ण परमहंस यांना त्यांच्या बालपणी एका बंगाली नाटकात शिवाची भूमिका मिळाली होती. ती भूमिका करतांना ‘ते ध्यानावस्थेत गेले होते’, असे म्हणतात. देवतेची भूमिका साकारणार्या कलाकारांमध्ये मुळातच सात्त्विकता असल्याने त्यांच्या अभिनयातून देवतेचे तत्त्व जाणवत असे. अनेक कलाकारांना देवतांच्या भूमिका साकारतांना अनेक दैवी अनुभूती आल्या आहेत आणि त्यानंतर ते साधनेला लागले आहेत.
या लेखमालिकेत ‘श्रीकृष्ण’ ही भूमिका साकारलेल्या पूर्वीच्या आणि अलीकडच्या काही दूरचित्रवाहिनीवरील मालिका यांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे.
१. पूर्वीचे काही दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते यांच्यातील भक्तीभाव अन् कलाकारांची देवतेवरील श्रद्धा यांमुळे ते चित्रपट अन् मालिका लोकांच्या पसंतीस उतरणे
वर्ष १९८७ ते १९९० या कालावधीत रामानंद सागर आणि बी.आर्. चोप्रा हे निर्माते अन् दिग्दर्शक असलेल्या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या धार्मिक मालिका पुष्कळ गाजल्या. त्या लोकांच्या पसंतीस उतरल्या. या मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या मनात देवतेप्रती भक्ती अन् श्रद्धा होती. त्यांचा ‘समाजात भक्तीभाव वृद्धींगत व्हावा’ हा उद्देश होता. या मालिकांचे कथानक लिहितांना त्यांनी अनेक पौराणिक ग्रंथांचा अभ्यासही केला होता.
२. पूर्वीचे दिग्दर्शक सात्त्विक प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कलाकार सात्त्विक घडणे
अभिनेता हा दिग्दर्शक, लेखक आणि ‘रिसर्च क्रू’ (संशोधन करणारा समूह) यांच्या मार्गदर्शनानुसार दिलेली भूमिका साकारतो. पूर्वीचे दिग्दर्शक सात्त्विक प्रवृत्तीचे होते. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कलाकारही सात्त्विक प्रवृत्तीचे घडू लागले. परिणामी त्यांच्या व्यक्तीरेखांमध्ये लोकांना देवतेचे रूप दिसू लागले. दिग्दर्शक आणि निर्माते श्री. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील श्री. अरुण गोविल यांनी साकारलेला ‘राम’ बघून लोक त्यांना नमस्कार करत असत.
३. कलाकाराने देवतेचे पात्र साकारण्यामागील आध्यात्मिक पार्श्वभूमी !
३ अ. कलाकारात एखाद्या देवतेचे तत्त्व काही अंशी असल्यास ईश्वरच त्याची देवतेच्या पात्रासाठी निवड करत असणे; मात्र ‘याचा आध्यात्मिक स्तरावर कसा लाभ करून घ्यायचा ?’, हे सर्वस्वी त्या कलाकाराच्या हातात असणे : संस्कृतमध्ये ‘शिवो भूत्वा शिवं यजेत् ।’, म्हणजे ‘शिवस्वरूप होऊन शिवाची आराधना करावी’, असे म्हणतात. त्यामुळे देवतेचे पात्र साकारण्यासाठी स्वतःत देवत्व आणणे अन् साधना करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मनाची शुद्धता, अल्प अहं इत्यादी गुण कलाकारात असतील, तर त्याने साकारलेल्या पात्रात अधिक चैतन्य येते. याउलट कलाकारांत स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असेल अन् त्याच्यात भक्तीभाव नसेल, तर त्याने कितीही उत्तम अभिनय केला, तरी त्याच्या अभिनयात देवत्व जाणवत नाही. ‘कलाकारांची मागच्या जन्मीची साधना, पुण्यबळ आणि देवतेचे पात्र साकारण्यासाठी कलाकारात मुळात त्या देवतेचे तत्त्व काही अंशी असल्यामुळे त्या कलाकाराने त्या देवतेची भूमिका साकारण्यासाठी देवच त्यांची निवड करतो’, असे आम्हाला वाटते.
३ आ. कलाकाराच्या चेहर्यावर तेज जाणवून देवतातत्त्वाची अनुभूती येणे : देवतेचे पात्र साकारतांना कलाकाराला क्षणभर का होईना, देवतेच्या शक्तीची अनुभूती येते. बी.आर्. चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘महाभारत’ मालिकेत श्रीकृष्ण कौरवांच्या सभेत शांतीप्रस्ताव घेऊन जातो. तेव्हा दुर्योधन चिडून ‘याला (श्रीकृष्णाला) बंदी बनवा’, असा आदेश देतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण विराट रूप धारण करून आवेशाने म्हणतो, ‘‘मला बंदी बनवायचे असेल, तर एकदा प्रयत्न करून बघा !’’ तेव्हा कृष्णाची भूमिका साकारणार्या श्री. नितीश भारद्वाज यांचा चेहरा नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी दिसून त्या प्रसंगात ‘त्यांच्यात नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात कृष्णतत्त्व अवतरले’, असे आम्हाला जाणवले.
४. देवतेचे पात्र साकारल्यावर कलाकाराची एक विशिष्ट प्रतिमा सिद्ध झाल्यामुळे नंतर त्यांना अन्य प्रकारच्या भूमिका न मिळणे; मात्र ते अध्यात्मात पुढे जाणे
कलाकाराने एखाद्या देवतेचे पात्र साकारल्यानंतर समाजमनावर कलाकाराची तीच प्रतिमा (छबी) टिकून रहाते. अशा कलाकारांना पुढे वेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळत नाहीत किंवा ते त्या भूमिका स्वीकारत नाहीत, उदा. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत प्रभु श्रीरामाचे पात्र साकारल्यानंतर श्री. अरुण गोविल यांचे श्रीरामाचे पात्र समाजमनावर अधिक ठसले आणि त्यांनाही स्वतःला ‘राम’ म्हणवून घेण्यातच अधिक आनंद वाटतो.’
रामानंद सागर यांच्या ‘श्रीकृष्ण’ मालिकेत काम करणारे अनेक जण एकमेकांत अध्यात्माविषयी बोलत असणे‘रामानंद सागर दिग्दर्शित श्रीकृष्ण मालिकेमध्ये काम करणार्या अनेक जणांना अध्यात्माची गोडी लागली. या मालिकेचे छायाचित्रीकरण करणार्यानेही (‘कॅमेरामनने’ही) अध्यात्माची वाट धरली. त्या काळात अगदी ‘स्पॉटबॉय’ही ‘ध्यान’, ‘योग’ इत्यादींविषयी सविस्तर चर्चा करायचे. ‘रामानंद सागर स्वतः आध्यात्मिक वृत्तीचे असल्याने त्यांच्या समवेत काम करणार्या अनेक कलाकारांना अध्यात्माची गोडी लागली’, असे म्हणता येईल. त्यांची कला अध्यात्माकडे वळल्याने कलेचा खरा उद्देश साध्य झाला.’ – कु. रेणुका कुलकर्णी आणि कु. म्रिण्मयी केळशीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (१७.५.२०२२) |
(क्रमशः)
– कु. रेणुका कुलकर्णी (संगीत अभ्यासक) आणि कु. म्रिण्मयी केळशीकर (नाट्य आणि संगीत अभ्यासक), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (१७.५.२०२२)