नागपूर – भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील खातखेडा या गावातील बसस्थानकालगत बसलेल्या ईश्वर मोटघरे (वय ५२ वर्षे) यांच्यावर वाघाने आक्रमण करून त्यांना ठार केल्याची घटना २८ जून या दिवशी घडली. त्यानंतर घटनास्थळावर पोचलेल्या वनाधिकार्यांवर संतप्त ग्रामवासियांनी आक्रमण केले. पवनी तालुक्यात २३ जून या दिवशी गुडेगाव येथे याच वाघाने पहिला बळी घेतला होता. तरीही उपाययोजना न केल्याने ग्रामस्थ वन विभागावर संतप्त झाले होते.
२ दिवसांपूर्वी याच परिसरातील गुडेगाव येथील एकाला वाघाने ठार केले होते. त्यामुळे अगोदरच ग्रामस्थांमध्ये वन विभागाच्या विरोधात असंतोष होता. २८ जून या दिवशी झालेल्या दुसर्या घटनेने अनुमाने ४-५ गावांतील संतप्त नागरिक घटनास्थळी पोचले. त्यांनी रोष व्यक्त करतांना साहाय्यक वनसंरक्षक यशवंत नागुलवार यांना अमानूष मारहाण केली. त्यासमवेतच तिथे उपस्थित असलेल्या महिला कर्मचार्यांनाही ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला असून सध्या गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाघाच्या आक्रमणाच्या घटनांत मोठी वाढ !
चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत वाघाच्या आक्रमणात ठार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाघ मानवी वस्तीत आल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. यापूर्वी २०२२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातच शेतात काम करत असलेल्या शेतकर्यावर वाघाने आक्रमण करून ठार केल्याची घटना कुडेसावली गावात घडली होती.