दुधात भेसळ करणार्‍यावर गुन्‍हा नोंद होणार, तर स्‍वीकारणारा सहआरोपी होणार !

मुंबई – राज्‍यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. दुधाचे एकूण उत्‍पादन आणि मागणी यांमध्‍ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. नागरिकांच्‍या आरोग्‍यावर याचा होत असलेला विपरित परिणाम लक्षात घेऊन दुधातील भेसळ रोखण्‍यासाठी दूध भेसळ करणार्‍यांवर गुन्‍हा नोंदवावा, तसेच भेसळयुक्‍त दूध स्‍वीकारणार्‍यांना सहआरोपी करावे, असे निर्देश राज्‍यशासनाकडून २८ जून या दिवशी निर्गमित केले आहेत.

दुधातील भेसळ रोखण्‍यासाठी अपर जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली राज्‍यातील सर्व जिल्‍ह्यांत समितीची स्‍थापना करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने घेतला आहे. या समितीने पुढील एका मासांत त्‍या त्‍या जिल्‍ह्यातील दुधातील भेसळीचा अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे. राज्‍यातील दुधाचे दर आणि दुधातील भेसळ यांविषयी नुकतीच दूध उत्‍पादक, सहकारी अन् खासगी दूध संघ, पशूखाद्य उत्‍पादक आणि शेतकरी संघटना यांचे प्रतिनिधी यांची २२ जून या दिवशी पशूसंवर्धन अन् दुग्‍धव्‍यवसाय विकासमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍यासमवेत बैठक झाली. या बैठकीमध्‍ये भेसळयुक्‍त दुधाला पायबंद घालण्‍यासाठी समिती गठीत करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. दूध आणि दुग्‍धजन्‍य पदार्थ यांतील भेसळ रोखण्‍यासाठी या समितीने धडक शोधमोहीम हाती घेण्‍याची सूचना करण्‍यात आली आहे.