१ जुलैपासून अमरनाथ यात्रेस आरंभ !

  • यात्रेत तंबाखूवर बंदी !

  • अडीच किमीच्या प्रवासात शिरस्त्राण घालणे बंधनकारक !

  • यात्रेसाठी ३ लाखांहून अधिक यात्रेकरूंची नोंदणी !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – १ जुलैपासून चालू होणार्‍या अमरनाथ यात्रेची सर्व सिद्धता अंतिम टप्प्यात आहे. या वेळी यात्रा पूर्णपणे तंबाखूमुक्त असेल. जम्मू-काश्मीरच्या आरोग्य विभागाने २८ जूनला या दृष्टीने प्रसारित केलेल्या आदेशनुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत यात्रा तंबाखूमुक्त असेल. यासह ‘अमरनाथ श्राइन बोर्डा’नेही काही नियम केले आहेत. त्यानुसार यात्रेकरूंना अडीच किमीच्या अतीजोखमीच्या मार्गावर शिरस्त्राण (हेल्मेट) घालणे बंधनकारक असणार आहे. एवढेच नाही, तर खेचरावर बसून  जाणार्‍या भाविकांना शिरस्त्राण अनिवार्य असणार असेल. ‘श्राइन बोर्डा’कडून शिरस्त्राण विनामूल्य दिले जाणार आहे.

१. यात्रेकरूंची पहिली तुकडी ३० जून या दिवशी ‘जम्मू भगवती नगर बेस कॅम्प’ येथून मार्गस्थ होईल.

२. गतवर्षी पवित्र गुहेजवळ ढगफुटी होऊन पूर आला होता. त्यामुळे या वेळी अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.

३. २८ जूनपर्यंत ३ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली होती. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक आहे.

४. यावर्षी रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रवाशाला पवित्र गुहेजवळ थांबण्याची अनुमती दिली जाणार नाही.

५. अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीर प्रशासनाने बालटाल आणि चंदनवाडी येथे प्रत्येकी १०० खाटांची दोन रुग्णालये बांधली आहेत. प्रशासनाने या अत्याधुनिक रुग्णालयांसाठी १३ कोटी रुपये खर्च केले आहेत. ‘श्राइन बोर्डा’ने १ सहस्र ७०० डॉक्टर आणि कर्मचारी तैनात केले आहेत.

पाकच्या घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू !

पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेले घुसखोरीचे प्रयत्न आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सांबामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपासून एक किमी अंतरावर कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीच्या वेळी स्थानिक गावकरी आणि इतर लोकांना त्यांची ओळख सांगावी लागणार आहे.

संपादकीय भूमिका

बहुसंख्यांक समाजाच्या धार्मिक यात्रांवर जिहादी आतंकवादाचे सावट असलेला जगातील एकमेव देश भारत !