येत्या १३ जुलैला ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित होणार !

मुंबई – ‘चंद्रयान-३’ येत्या १३ जुलैला दुपारी २.३० वाजता प्रक्षेपित करण्यात येणार आहे, अशी अधिकृत माहिती ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात् ‘इस्रो’कडून देण्यात आली. इस्रोने वर्ष २०१९ मध्ये ‘चंद्रयान-२’ प्रक्षेपित केले होते. हे यान चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यात यशस्वी ठरले होते. यामध्ये एक ‘लँडर’ (यानातून चंद्राच्या भूपृष्ठावर उतरणारा भाग) चंद्राच्या भूमीवर उतरणार होते आणि त्यातून एक ‘रोव्हर’ म्हणजे एक छोटी गाडी बाहेर येणार होती; पण चंद्रावर उतरतांना हे ‘लँडर’ कोसळले. त्यामुळे ही मोहीम अपयशी ठरली होती.

या वेळी इस्रोच्या अधिकार्‍यांना चंद्रयान-३ च्या यशाविषयी विश्‍वास आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर हे यान सुखरूप उतरवणे आणि नंतर चंद्राच्या भूमीवर ‘रोबोटिक रोव्हर’ (लहान गाडी) तैनात करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेसाठी ६१५ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.