एकादशी (हरिदिनी) व्रत !
या व्रताची देवता श्रीविष्णु आहे. हे व्रत इतर व्रतांप्रमाणे संकल्पाने विधीपूर्वक आरंभ करावे लागत नाही. काळानुसार प्रत्येकातील सत्त्व, रज आणि तम गुणांचे प्रमाण पालटत असते. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता सर्वांत जास्त असते. या दिवशी उपवास, तसेच अन्य उपासना करून व्यक्तीला तिची सात्त्विकता आणखी वाढवता येते. एकादशीला काही न खाता केवळ पाणी आणि सुंठसाखर घेतल्यास ते सर्वोत्तम होय. हे शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावेत. दुसर्या दिवशी पारणे सोडावे.
एकादशीच्या दिवशी श्रीविष्णुस्पंदने पृथ्वीवर जास्त प्रमाणात येतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशी या तिथींना पृथ्वीवर विष्णुस्पंदने वर्षातील अन्य एकादशींपेक्षा जास्त प्रमाणात येतात; म्हणून या दोन एकादशींना जास्त महत्त्व आहे.
आषाढी एकादशीचे महत्त्व
अ. या तिथीला एकादशीदेवीची उत्पत्ती झाली.
आ. या तिथीला चातुर्मास प्रारंभ होतो.
इ. याच दिवशी श्रीविष्णु क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये लीन होतो.
ई. याच तिथीला श्री विठ्ठलभक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपुरात आला. (संदर्भ : देवतांची उपासना : खंड ४ ‘श्री विठ्ठल’)
निर्जला एकादशी (भीमसेनी एकादशी)
निर्जला एकादशीचे व्रत महर्षी व्यासांनी भीमाला सांगितले. भीमाचा आहार विलक्षण ! त्याला वर्षभरातील चोवीस एकादशा करणे शक्य नव्हते; म्हणून त्याने महर्षी व्यासांच्या उपदेशानुसार ज्येष्ठ शुक्ल एकादशीला पाणीही न पिता उपवास केला आणि त्याला वर्षभरातील चोवीस एकादशी केल्याचे पुण्य मिळाले ! निर्जला एकादशी केल्यामुळे सर्व एकादशी केल्याचे पुण्य लाभणे, हेच तिचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
(एकादशीविषयक अन्य विवरणासाठी सनातनचा ‘धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र’ हा ग्रंथ वाचा.)
(संदर्भ : देवतांची उपासना : खंड ४ ‘श्री विठ्ठल’)