लातूर येथील १६ कृषी केंद्रांवर कारवाई !

कृषी विभागाने केलेल्‍या नियमांचे पालन न केल्‍याने परवाने रहित

लातूर – कृषी विभागाने केलेल्‍या नियमांचे पालन न करणार्‍या २ कृषी केंद्राचे परवाने कायमस्‍वरूपी रहित करण्‍यात आले असून १४ केंद्राचे परवाने निलंबित करण्‍यात आले आहेत. येथील कृषी विभागाने ही कारवाई केली आहे. खरीप हंगामात शेतकर्‍यांना वेळेवर बियाणे आणि खते पुरवठ्यासाठी कृषी विभागाने काही सूचना केल्‍या होत्‍या. त्‍या सूचनांचे पालन न केल्‍यामुळे ही कारवाई करण्‍यात आली आहे. ‘कुणी गैरप्रकार करत असतील, तर त्‍यांच्‍या विरोधात कडक कारवाई करण्‍यात येईल. आमची अनेक पथके सातत्‍याने या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत’, अशी चेतावणी प्रभारी जिल्‍हा कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी या वेळी दिली.

कृषी आयुक्‍तांच्‍या सूचनेनुसार लातूर जिल्‍ह्यातील भरारी पथकाच्‍या माध्‍यमातून  कृषी निरीक्षकांकडून कृषी निविष्‍ठा विक्री केंद्रांची पडताळणी करण्‍यात आली. या पडताळणीमध्‍ये कृषी सेवा केंद्रात विक्री परवाना दर्शनी भागात न लावणे, साठा आणि भाव यांचे फलक सहज दिसेल अशा ठिकाणी नसणे, साठा नोंदवही अद्ययावत् न ठेवणे, देयकांवर शेतकर्‍यांची स्‍वाक्षरी किंवा अंगठा न घेणे, विक्री देयकामध्‍ये बियाण्‍यांची संपूर्ण माहिती न देणे अशा अनेक त्रुटी या केंद्रामध्‍ये आढळून आल्‍या होत्‍या.