दुभत्या गायी, म्हशी आदी प्राण्यांना संगीत ऐकवल्यावर दूध देण्याची क्षमता वाढली !

  • नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटचे संशोधन

  • प्राण्यांना येणार्‍या ताणात घट !

कर्नाल (हरियाणा) – येथील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या हवामान प्रतिरोधक पशूधन संशोधन केंद्राने दुभत्या प्राण्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी एक अनोखे संशोधन केले आहे. गेले ४ वर्षे हे संशोधन चालू होते. यानुसार या जनावरांना संगीत ऐकवण्यात येत होते. ‘ज्याप्रमाणे मानवाला संगीत आवडते आणि संगीत ऐकून स्वत:ला चांगले वाटते, त्याचप्रमाणे मधुर सूर किंवा संगीत प्राण्यांना तणावमुक्त ठेवते’, असे या संशोधनातून समोर आले आहे. संगीतामुळे प्राण्यांचे आरोग्य तर सुधारतेच, याखेरीज त्यांची दूध देण्याची क्षमताही वाढते, असेही या संशोधनातून समोर आले आहे.

१. हवामान प्रतिरोधक पशूधन संशोधन केंद्राचे ज्येष्ठ प्राणीशास्त्रज्ञ डॉ. आशुतोष यांनी सांगितले की, गायींना संगीत आणि स्तोत्रे आवडतात, असे फार पूर्वी ऐकले होते. जेव्हा आम्ही हा प्रयोग केला, तेव्हा त्याचे परिणाम अतिशय चांगले निघाले. संगीताच्या लहरी गायीच्या मेंदूतील ऑक्सिटोसिन हार्मोन सक्रीय करतात आणि गायीला दूध देण्यास प्रवृत्त करतात.

२. डॉ. आशुतोष यांनी सांगितले की, जनावरांना एकाच ठिकाणी बांधून ठेवल्याने ते तणावग्रस्त होतात आणि नीट वागत नाहीत; मात्र येथे आम्ही प्राण्यांना असे वातावरण देत आहोत, ज्यामध्ये प्राण्यांवर कोणताही दबाव नसतो आणि त्यांना तणावमुक्त ठेवता येते. संशोधनात संगीत आणि भजन यांचा वापर करण्यात आला असून त्याचे चांगले परिणाम समोर आले आहेत. संगीत ऐकून प्राण्यांच्या वर्तनाची चाचणी घेण्यात आली आणि असे आढळून आले की, प्राणी कडक उन्हातही स्वतःला निवांत ठेवतात. त्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनावरही परिणाम झाला आणि ते पूर्वीपेक्षा अधिक दूध देऊ लागले.