१. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडले गेल्यानंतर जीवनाला योग्य दिशा मिळून स्थिरता लाभणे
‘मी (श्री. आकाश तुकाराम चव्हाण) हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी २०१९ पासून जोडलेलो आहे. समितीशी जोडले जाण्याआधी माझे जीवन अत्यंत अस्थिर, अशांत आणि दिशाहीन होते. त्या वेळी साधकांच्या माध्यमातून तुम्ही (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) मला योग्य जीवन जगण्याची दिशा दिलीत. ‘प्रारब्ध काय असते ? साधना म्हणजे काय ? साधनामय जीवन कसे जगावे ?’, हे कळले. ‘प्रापंचिक जीवनात जे प्रसंग घडतात, ते आपले प्रारब्ध आहे. ते साधनेद्वारे कसे पार करता येईल ? साधना करून संयमी कसे रहावे ?’, हे त्यांच्या माध्यमातून समजावलेत. त्यामुळे माझी मानसिक सिद्धता चांगली झाली. माझे मन स्थिर झाले आणि योग्य निर्णयक्षमता वाढली. त्या माध्यमातून मी समितीशी जोडलो गेलो आणि सेवेचे कार्य चालू केले. त्यातून साधनेशी जोडलो गेलो. त्यामुळे माझे मन प्रसन्न राहू लागले. मला जीवनात आनंद आणि स्थिरता लाभली.
२. उत्तरदायी साधकांनी साधनेच्या आढाव्यात सांगितल्यानुसार केलेले प्रयत्न
उत्तरदायी साधकांनी व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना ‘भाव ठेऊन कृती कशी करावी ?’, हे सांगितले. माझ्या जळगावातील ३ दुकानांना मी एक व्यासपीठ समजतो आणि तेथे मी माझ्याकडे येणार्या ग्राहकांना हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी जोडण्याचा प्रयत्न करतो. त्यांना धर्माविषयी माहिती देतो. त्या माध्यमातून पुष्कळ ग्राहक हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी जोडले जातात. ही सर्व कृती मी ‘परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्याकडून करवून घेत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत’, असा भाव ठेवून करत असतो. माझ्या दुकानातील कामगारांनाही मी सेवेसाठी प्रेरीत करतो. तेसुद्धा आनंदाने सेवेत सहभागी होतात आणि सेवा करतात.
३. जीवनात आलेल्या कठीण प्रसंगाला साधनेमुळे सामोरे जाता येणे
जळगावला डिसेंबर २०२२ च्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचाराच्या वेळी माझ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. साधनेमुळे त्या घटनेने मी खचून गेलो नाही. या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी जी काही शक्ती मिळाली, ती साधनेतून मिळाली. या घटनेच्या चौथ्या दिवशीच मी परत हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेसाठी बाहेर पडलो अन् सेवा चालू केली. ‘सभेचे मैदान हे हिंदु राष्ट्र निर्मिण्याचे एक रणक्षेत्र आहे. ही सभा, म्हणजे हिंदु राष्ट्र आणण्याचे युद्ध आहे’, असा भाव ठेवून मी सेवारत राहिलो. जणू प.पू. डॉक्टरांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माझ्याकडून ही सेवा करून घेतली. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. आकाश तुकाराम चव्हाण, जळगाव (२४.३.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |