संभाजीनगर येथे अडीच मासांचे बाळ ५ लाख रुपयांत विकले !

अनाथाश्रमावर बंदी, चालक दांपत्‍य पोलिसांच्‍या कह्यात !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – शिवशंकर कॉलनी येथील ‘जिजामाता बालक आश्रमा’तील एका अडीच मासांच्‍या बालकाची कॅनॉटमधील व्‍यापार्‍याला तब्‍बल ५ लाख रुपयांना विक्री करणार्‍यांचा भांडाफोड दामिनी पथकाने केला. २० जूनच्‍या सकाळी ११ वाजण्‍याच्‍या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. दिलीप राऊत (वय ५२ वर्षे) आणि त्‍याची पत्नी सविता यांना पोलिसांनी कह्यात घेतले असून आश्रमावर बंदी घातली आहे.

भरोसा सेल’च्‍या पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्‍या पथकाला खबर्‍याकडून शिवशंकर कॉलनी येथील जिजामाता अनाथाश्रमाचा संस्‍थाचालक एका अडीच मासांच्‍या बाळाची विक्री करणार असल्‍याची माहिती मिळाली होती. त्‍यावरून दामिनी पथकाच्‍या निरीक्षक अनिता फसाटे आणि त्‍यांच्‍या पथकाने जिजामाता बालक आश्रमाची झडती घेतली. तेव्‍हा एका खोलीत साडीच्‍या झोळीत अडीच मासांचा मुलगा झोपलेल्‍या स्‍थितीत आढळून आला. पोलिसांनी आश्रमचालक राऊत याची चौकशी केली असता त्‍याने उडवाउडवीची उत्तरे देण्‍यास प्रारंभ केला. पोलिसांनी खाक्‍या दाखवताच त्‍याने सर्व माहिती दिली. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. दिलीप राऊत याने हे बाळ आमच्‍या पैठण येथील नातेवाईक महिलेचे असून त्‍या आजारी असल्‍याने बाळ येथे ठेवल्‍याचे सांगितले; मात्र त्‍याचा पुरावा दिला नाही. त्‍यामुळे पोलीस आता बाळाच्‍या जन्‍मदात्रीचा शोध घेत आहेत.