धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी आदिवासींच्या घरापर्यंत पोचायला हवे ! – महेंद्र राजपुरोहित, अग्निवीर, नवसारी, गुजरात

( प्रतिकात्मक छायाचित्र )

रामनाथी, २१ जून (वार्ता.) – आदिवसांचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून षड्यंत्र चालू आहे. ख्रिस्ती मिशनरी आदिवासींना आर्थिक साहाय्य करून त्यांच्यामध्ये स्वतःविषयी सहानुभूती निर्माण करत आहेत. त्यातूनच धर्मांतर होते. आदिवासींच्या घरामध्ये जाऊन ख्रिस्ती त्यांना जवळ करतात. त्यांच्या समस्या सोडवतात. हिंदू संघटना मात्र आदिवासींपर्यंत पोचत नाही आणि ‘आदिवासी धर्मांतर करतात’, असे म्हणतात. प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या घरापुढे तुळस असते, कपाळाला तिलक असतो. प्रत्येकाच्या घरी गाय असते. असे असूनही ‘आदिवासी धर्मांतर का करतात ?’ यावर विचार करणे आवश्यक आहे.

महेंद्र राजपुरोहित, अग्निवीर, नवसारी, गुजरात

आदिवासींचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना तळागाळापर्यंत जाऊन आदिवासींना धर्माविषयी जागृत करावे लागेल. आदिवासींचे धर्मांतर रोखण्यासाठी आम्हीही आदिवासी कुटुंबियांपर्यंत पोचलो. आदिवासी युवक-युवतींचे सामूहिक विवाह लावून देणे, युवकांसाठी खेळांचे आयोजन करणे आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, यांसाठी आम्ही प्रयत्न केले. आतापर्यंत ९ सहस्र आदिवासी बंधू-भगिनींची आम्ही घरवापसी केली आहे.

मुगल आणि इंग्रज यांनी आक्रमण करूनही आपल्या पूर्वजांनी हिंदु धर्म सोडला नाही, याचा आपण अभिमान बाळगायला हवा, असे उद्गार नवसारी (गुजरात) येथील ‘अग्निवीर’ संघटनेचे महेंद्र राजपुरोहित यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.