सनातनच्‍या साधकांमध्‍ये माऊलीचे रूप पाहून सेवा करणारा भोज, कोल्‍हापूर येथील श्री गजानन महाराज भक्‍त परिवार !

‘११.५.२०२३ या दिवशी होणार्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’निमित्त संभाजीनगर येथून काही साधक गोवा येथे जाण्‍यास निघाले होते. संभाजीनगर ते गोवा प्रवास दूरचा असल्‍यामुळे कोल्‍हापूर येथून ३० कि.मी. अंतरावर भोज नावाच्‍या गावात साधकांची निवास आणि भोजन यांची व्‍यवस्‍था केली होती. त्‍या गावातील शेगाव येथील श्री गजानन महाराज भक्‍त परिवाराने ती व्‍यवस्‍था केली होती. ही व्‍यवस्‍था, म्‍हणजे जणू श्रीकृष्‍णाने सुदाम्‍यासाठी केलेली व्‍यवस्‍थाच वाटत होते.

भक्‍त परिवाराची अनुभवलेली प्रीती आणि त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

कु. प्रियांका लोणे

१. आम्‍ही गावात पोचल्‍यावर जवळपास ४० जण आमच्‍या स्‍वागतासाठी चौकात उभे होते. आम्‍ही तेथे पोचल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘आम्‍ही संध्‍याकाळी ६.३० पासून ‘कधी माऊली (श्री गजानन महाराज) येतील ?’, अशी आस धरून बसलो होतो. तुमच्‍या रूपात तेच आज इथे आले आहेत.’’

२. एका सभागृहात त्‍यांनी महाप्रसादाची सोय केली होती. तिथे हात धुण्‍यासाठी पाणी आणि हात पुसण्‍यासाठी पंचा ठेवला होता. मी पाणी घ्‍यायला गेल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘माऊली, आम्‍ही हातावर पाणी घालतो.’’ पुष्‍कळदा त्‍यांना ‘नको’ म्‍हटले; पण त्‍यांचा भाव पाहून डोळे भरून आले.

३. त्‍यांनी ‘सर्व महाप्रसाद गरम कसा मिळेल ?’, अशी व्‍यवस्‍था केली होती. कुणाची या आधी ओळख नसतांनाही त्‍यांनी एवढ्या जणांसाठी पिठले, भाकरी, वरण, भात, खीर, ताक असे पदार्थ महाप्रसादात दिले.

४. ‘श्री गुरूंचे तत्त्व एकच असून श्री गजानन महाराज यांचा भक्‍त परिवार हा गुरुमाऊलीचाच (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचाच) आहे’, असे मला वाटत होते.

५. आम्‍ही दुपारच्‍या जेवणात शिल्लक राहिलेली आमची पोळी-भाजी भोजनाच्‍या ठिकाणी घेऊन गेलो. तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘हे शिळे अन्‍न आम्‍हाला द्या. माऊली, तुम्‍ही हे गरम जेवा.’’

६. जेवण झाल्‍यावर आम्‍ही पत्रावळीची घडी घालत होतो. तेव्‍हाही त्‍यांनी आम्‍हाला पत्रावळी उचलू दिल्‍या नाहीत.

७. नंतर प्रत्‍येक पुरुष साधकाला टिळा लावून ‘पंचा आणि टोपी’ अन् साधिकांची खण देऊन ओटी भरली आणि त्‍यांनी सर्वांना वाकून नमस्‍कार केला. आम्‍ही त्‍यांना नमस्‍कार करायला गेलो, तर ते म्‍हणाले, ‘‘नको माऊली, तुमची सेवा करायची संधी मिळाली, हे आमचे अहोभाग्‍य !’

८. आम्‍हाला वाहतुकीच्‍या कोंडीमुळे गावात पोचायला रात्री १०.१५ वाजले होते, तरीही त्‍यांचे चेहरे आनंदी आणि गुरूंच्‍या प्रतीक्षेत असे होते. रात्री १२ वाजताही तितक्‍याच आनंदाने, भक्‍तीने त्‍यांनी सेवा केली. ‘भोळा भाव, भक्‍ती, यांनी प्रत्‍येकात गुरुरूप पहाणे, हे सर्व गुरुमाऊली (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आम्‍हाला यांच्‍या माध्‍यमातून शिकवत आहेत’, असे वाटले.

९. त्‍यांच्‍या भावापुढे शब्‍दच नव्‍हते. डोळ्‍यांतील अश्रूंनीच कृतज्ञता व्‍यक्‍त करणे शक्‍य होते.

जन्‍मोत्‍सवाच्‍या आधी गुरुदेवांनी आम्‍हाला श्रीगुरूंची अद़्‍भुत, अविस्‍मरणीय कृपा आणि अलौकिकपणा हे सर्व केवळ ३ घंट्यांत ‘याची देही याची डोळा’, अनुभवायला दिले, यासाठी ‘कृतज्ञता’ हा शब्‍द पुष्‍कळ अपुरा आहे.’

– कु. प्रियांका लोणे (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के), छत्रपती संभाजीनगर (१६.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक