अकोला – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. त्यांच्या या कृतीने वाईट वाटले. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही; पण औरंगजेब आमचा नेता आणि आमचा राजा कसा होऊ शकतो ? आमचा राजा एकच आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ जून या दिवशी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले.
ते म्हणाले, ‘‘भाग्यनगर (हैदराबादच्या) येथील निजामाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्यासमवेत सामील करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आमिषे दिली. ‘बुद्ध धम्म घेऊ नका’, असे निजाम बाबासाहेबांना म्हणत होता. त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, मी तोच धम्म स्वीकारीन, जो भारताच्या भूमीत सिद्ध झाला असेल. अशा बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही वंशज आहात. त्यामुळे तुमच्याकडून असे वर्तन अपेक्षित नाही.’’
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतातील मुसलमान आणि औरंगजेब यांचा काहीच संबंध नाही. ते औरंगजेबाचे वंशज नाहीत. भारतीय मुसलमान हा राष्ट्रवादी विचारांचा मुसलमान आहे. ते औरंगजेबाला मानत नाहीत. (सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चाललेले औरंगजेबाचे उदात्तीकरण रोखण्यासाठी गृह विभाग कोणती ठोस पावले उचलणार आहे ? – संपादक)
आपल्या राज्यात काही लोक शांतता नांदू नये; म्हणून प्रयत्न करत आहेत. अचानक काही लोक औरंगजेबाचा ‘स्टेटस’ कसे ठेवू लागले ? छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि कोल्हापूर येथे जे घडले, तो योगायोग नाही, तर एक प्रयोग आहे. राज्यात औरंग्याच्या एवढ्या औलादी कुठून पैदा झाल्या ? त्यांना कुणीतरी पैदा करत आहे. काही लोकांना मळमळ आणि जळजळ होत आहे. (अशी सर्व माहिती मिळाली असेल, तर गृह विभागाने संबंधितांवर त्वरित कारवाई करून समाजविघातक कृती रोखाव्यात ! तसे झाल्यास हिंदूंनाही न्याय मिळेल ! – संपादक)