व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेण्‍याच्‍या माध्‍यमातून साधकांना साधनेत साहाय्‍य करणार्‍या ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. स्‍वाती संदीप शिंदे (वय ३६ वर्षे) !

आषाढ शुक्‍ल द्वितीया (२०.६.२०२३) या दिवशी ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. स्‍वाती संदीप शिंदे यांचा ३६ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त साधकांच्‍या लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सौ. स्‍वाती संदीप शिंदे यांना ३६ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने हार्दिक शुभेच्‍छा !

सौ. स्‍वाती शिंदे

१. सौ. स्‍वाती शिंदे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये

अ. ‘स्‍वातीताई नेहमी सहजावस्‍थेत असतात.

आ. त्‍या कुठेही भेटल्‍यावर स्‍मितहास्‍य करतात.

२. सौ. स्‍वाती शिंदे साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे

सौ. स्‍वाती शिंदे स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणार्‍या साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतात. त्‍यांच्‍या आढावा घेण्‍याच्‍या पद्धतीविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

अ. ताई आढावा घेण्‍यापूर्वी २ मिनिटांचा भावजागृतीचा प्रयोग घेतात. त्‍या वेळी ‘प्रत्‍यक्ष परम पूज्‍य सत्‍संगात आले आहेत. त्‍यांनी आपल्‍या डोक्‍यावर हात ठेवला आहे. त्‍यांचा कृपाशीर्वाद आपल्‍या सर्वांवर आहे. त्‍यामुळे आपल्‍याला चैतन्‍य मिळत आहे. आपल्‍या नाकासमोर हात धरून ते आपल्‍या श्‍वासात चैतन्‍य भरत आहेत. आपण त्‍यांच्‍यासमोर हात जोडून शरणागतीने उभे आहोत’, असा किंवा यापैकी एखादा भावजागृतीचा प्रयोग घेतात.

आ. ‘ताईंच्‍या माध्‍यमातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले आढावा घेण्‍यासाठी आले आहेत’, असे आम्‍हाला जाणवते आणि आमची भावजागृती होते.

इ. ताईंनी घेतलेला व्‍यष्‍टी साधनेचा आढावा भावसत्‍संगाप्रमाणे जाणवतो. तेव्‍हा ‘आमच्‍या समोर परम पूज्‍य सूक्ष्मातून बसले आहेत आणि त्‍यांच्‍यामुळे आम्‍हाला चैतन्‍य मिळत आहे’, असे आम्‍हाला जाणवते.

ई. ताईंमध्‍ये काही वेळा आम्‍हाला सरस्‍वतीचे रूपही दिसते.

उ. ताई आढाव्‍यात काही वैशिष्‍ट्यपूर्ण जाणवले असल्‍यास ते साधकांना सांगण्‍यास सांगतात, तसेच ‘याच भावस्‍थितीत आपण परम पूज्‍यांना आढावा सांगूया’, असे सांगतात. त्‍यामुळे साधकांना व्‍यष्‍टी साधनेचा आढावा भावपूर्ण आणि वस्‍तूनिष्‍ठपणे देता येतो.

ऊ. त्‍या आढावा घेतांना एका घंट्याच्‍या कालावधीत २ – ३ वेळा प्रार्थना घेतात. त्‍यामुळे वातावरणातील दाब, साधकांवरील त्रासदायक आवरण आणि मनावरील ताण अल्‍प होतो.

ए. ‘ताईंच्‍या माध्‍यमातून गुरुदेव साधकांना घडवत आहेत’, असे आम्‍हाला जाणवते.

ऐ. ताईंची भाषा सर्वांना समजेल अशी सोपी असते.

ओ. ताई बोलत असतांना परम पूज्‍यांची सतत आठवण येते.

औ. ताईंनी आमच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतल्‍यावर आम्‍हाला उत्‍साह येत असे आणि पुढच्‍या आढाव्‍याची उत्‍सुकता लागत असे.’

– कु. कुशावर्ता माळी, सौ. विमल माळी आणि श्री. पुंडलिक माळी, फोंडा, गोवा.

३. तत्त्वनिष्‍ठ राहून आध्‍यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना व्‍यष्‍टी साधनेत साहाय्‍य करणे

‘मी आणि माझी आई स्‍वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवत होतो. आम्‍हाला तीव्र आध्‍यात्मिक त्रास आहे. स्‍वातीताई आमचा व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेत होत्‍या. त्‍या आमच्‍याकडून झालेल्‍या चुका तत्त्वनिष्‍ठ राहून सांगत असत. त्‍यांनी आम्‍हाला मानसिक किंवा भावनिक स्‍तरावर हाताळले नाही. त्‍यांनी आमच्‍याकडून झालेल्‍या चुकांमागील स्‍वभावदोष आणि अहंचे पैलू सांगितले. ते दूर करण्‍यासाठी साहाय्‍य केले. परिणामी आमचे आध्‍यात्मिक त्रास न्‍यून होण्‍यास साहाय्‍य झाले.’

– कु. कुशावर्ता माळी आणि सौ. विमल माळी

परम पूज्‍यांनी ताईंसारखे साधक घडवून आम्‍हाला त्‍यांचा सत्‍संग दिला. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– कु. कुशावर्ता माळी, सौ. विमल माळी आणि श्री. पुंडलिक माळी (३.६.२०२३)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.