आज आषाढ शुक्ल पक्ष द्वितीयेपासून श्री जगन्नाथ रथयात्रा आरंभ होत आहे. त्या निमित्ताने …
‘भारतातील ओडिशा राज्यातील ‘पुरी’ येथील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराची वार्षिक रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेपासून आरंभ होते. श्री जगन्नाथ पुरी येथील श्री जगन्नाथाचे मंदिर हे भारतातील प्राचीन आणि भारतातील पवित्र चारधाम मंदिरांपैकी एक आहे. ते ८०० वर्षांहून अधिक जुने आहे. येथे भगवान श्रीकृष्ण श्री जगन्नाथाच्या रूपात विराजमान आहेत. त्यांच्या समवेत त्यांचा मोठा भाऊ ‘बलभद्र’ म्हणजे ‘बलराम’ आणि बहीण ‘सुभद्रा’ यांचीही येथे पूजा केली जाते. वर्ष २०२२ मध्ये झालेल्या रथयात्रेचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत.
१. श्री बलराम, देवी सुभद्रा आणि श्री जगन्नाथाच्या रूपातील श्रीकृष्ण यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये
२. पुरीचा ‘गजपति’ राजा पालखीतून रथोत्सवात येणेे, त्याने तिन्ही रथांची पूजा करून सोन्याच्या झाडूने रथाचा मंडप आणि रथयात्रेचा मार्ग स्वच्छ करणे, या कृतींमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव
२ अ. स्थुलातील घटना : जेव्हा तिन्ही रथ सिद्ध होतात तेव्हा ‘छर पहानरा’ नावाचा विधी केला जातो. पुरीचा ‘गजपति’ राजा पालखीतून येथे येतो आणि या तीन रथांची पूजा करतो. त्यानंतर तो सोन्याच्या झाडूने रथाचा मंडप आणि रथोत्सवाचा मार्ग स्वच्छ करतो.
२ आ. स्थुलातील घटनेमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : राजाच्या रूपाने ब्रह्मदेवच येऊन भगवान श्री जगन्नाथाची सेवा करतो. तेव्हा ब्रह्मदेवाने धरलेल्या सोन्याच्या झाडूमध्ये श्रीलक्ष्मीदेवीचे तत्त्व कार्यरत झाल्यामुळे या झाडूने रथाचा मंडप आणि मार्ग स्वच्छ केल्यावर तेथील धूळरूपी अलक्ष्मीचे निरसन होते. त्यामुळे रथोत्सवाच्या वेळी तिन्ही रथांतून प्रक्षेपित झालेले चैतन्य रथाच्या मार्गावर आणि सभोवतालच्या परिसरात पुष्कळ प्रमाणात पसरते. त्यामुळे रथोत्सवात सहभागी झालेल्या भक्तांना ईश्वरी चैतन्याचा लाभ होऊन त्यांच्या आनंदात वृद्धी होते.
३. ढोल-ताशे वाजवून भाविकांनी तिन्ही रथ ओढण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव
३ अ. स्थुलातील घटना : ढोल-ताशे वाजवून भाविक हे तिन्ही रथ ओढतात. असे मानले जाते की, ज्यांना तिन्ही देवतांचे ओढण्याची संधी मिळते ते अत्यंत भाग्यवान असतात. पौराणिक मान्यतेनुसार जी व्यक्ती रथ ओढते, तिला मोक्षप्राप्ती होते.
३ आ. स्थुलातील घटनेमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : भाविकांनी तिन्ही देवतांचे रथ ओढण्यामागील पौराणिक मान्यता योग्य आहे. जे भाविक या रथयात्रेत सहभागी होतात, त्यांच्यातील भावामुळे त्यांच्यावर श्री बलराम, देवी सुभद्रा आणि श्री जगन्नाथ या तिन्ही देवतांची कृपा होऊन त्यांची कर्मबंधनातून मुक्ती होते. असे भाविक म्हणजे उच्च कोटीचे संतच असतात. त्यामुळे त्यांनी अनेक जन्मांमध्ये केलेल्या साधनेचे फळ भगवान श्रीजगन्नाथ त्यांना रथयात्रेच्या निमित्ताने देतो.
४. रथयात्रा श्री जगन्नाथाच्या मंदिरापासून आरंभ होऊन ‘गुंडीचा’ मंदिरापर्यंत गेल्यावर देवाने सर्वांना दर्शन देण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव
४ अ. स्थुलातील घटना : ही रथयात्रा श्रीजगन्नाथाच्या मंदिरापासून आरंभ होऊन ‘गुंडीचा’ मंदिरापर्यंत जाते. येथे श्रीजगन्नाथाच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि देवी सुभद्रा त्यांच्या मावशीला भेटायला जातात. येथे पोचल्यानंतर भगवान श्री जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा ७ दिवस विश्रांती घेतात. जेव्हा श्रीजगन्नाथाचे गुंडीचा मंदिरात दर्शन होते, तेव्हा त्याला ‘आडप दर्शन’ म्हणतात.
४ आ. स्थुलातील घटनेमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : रथयात्रेच्या वेळी भगवान श्री जगन्नाथाचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झालेले असते. त्यामुळे जेव्हा श्री जगन्नाथाचे गुंडीचा मंदिरात दर्शन होते, तेव्हा देवाचे भावपूर्ण दर्शन घेणार्या भाविकांवर श्रीविष्णूची कृपा होऊन त्यांचे विविध प्रकारचे पाप आणि ताप नष्ट होतात. त्यामुळे भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन त्यांच्या जीवनातील दु:ख आणि अडथळे दूर होऊन त्यांचे पुढील जीवन सुखकर अन् आनंददायी होते.
५. श्री जगन्नाथाच्या मंदिरापासून रथयात्रेचा आरंभ होऊन ती ‘गुंडीचा’ मंदिरापर्यंत जाणे आणि तेथे भगवंत ७ दिवस राहिल्यानंतर ही रथयात्रा पुन्हा पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिराकडे येण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव
५ अ. स्थुलातील घटना : गुंडीचा मंदिर हे भगवान श्री जगन्नाथाच्या मावशीचे घर आहे. याला ‘गुंडीचा बाडी’ असेही म्हणतात. आषाढ मासातील शुक्ल एकादशीला भगवान श्री जगन्नाथ परत मंदिरात येतात. यासह यात्रेचा प्रवास संपतो. परत आल्यानंतर सर्व मूर्ती रथातच रहातात. एकादशीच्या दुसर्या दिवशी म्हणजे द्वादशीला देवतांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. यानंतर तिन्ही देवतांच्या मूर्तींना विधीवत स्नान घालून पुरोहित नामजप करत या मूर्तींची तिन्ही मंदिरात पुनर्स्थापना करतात.
५ आ. स्थुलातील घटनेमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : या रथयात्रेच्या निमित्ताने श्रीजगन्नाथ त्यांच्या पुरी येथील मंदिरातून भक्तांना दर्शन देण्यासाठी मंदिरातून बाहेर येतात आणि गुंडीचा मंदिरात ७ दिवस भक्तांसमवेत रहातात. यातून श्रीविष्णूच्या ‘परम भक्तवत्सल’ या दैवी रूपाचे दर्शन होते. भाविकांना भगवंताचा दिव्य सत्संग लाभल्यामुळे त्यांच्या चित्तवृत्तीत पालट होतो. त्यांच्या चित्तावरील मायेचा प्रभाव दूर होऊन भगवंताच्या दिव्य अस्तित्वाचा आविष्कार होतो आणि त्यांना दिव्यत्वाची अनुभूती येते.
६. श्री जगन्नाथ रथयात्रेमागील आध्यात्मिक गमक
श्री जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्ताने त्यांच्या भक्तांना भेटण्यासाठी मंदिराच्या बाहेर येतो आणि पुढील ७ दिवस भक्तांसमवेत रहातो. यावरून ‘ज्याप्रमाणे भक्त भगवंताला भेटण्यासाठी आतूर झालेले असतात, त्याचप्रमाणे भगवंतही भक्तांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला असतो’, हे सूत्र शिकायला मिळाले. श्री जगन्नाथ यात्रेतून भक्त आणि भगवंत यांच्यातील अलौकिक नात्याची महती आपल्याला शिकायला मिळते.’
कृतज्ञता : ‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे श्री जन्नाथपुरी येथील सुप्रसिद्ध रथोत्सवातील प्रत्येक घटनेमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव उमजला आणि या रथयात्रेचे आध्यात्मिक महत्त्व उमजले’, यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे हे कार्य म्हणजे श्री जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखे दुर्गम कार्य आहे. ‘या दैवी कार्यात आम्हा साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना त्यांचे सर्वस्व अर्पण करता येवो अन् आमची साधना श्रीहरि अन् श्रीगुरु यांच्या चरणी समर्पित होवो’, हीच श्रीगुरूंच्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०२२)
|