‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चतुर्थ दिवस – मान्यवरांचे विचार
विद्याधिराज सभागृह, १९ जून (वार्ता.) – कोणत्याही राज्यात होत नसेल, एवढे हिंदूंचे धर्मांतर छत्तीसगड राज्यात चालू आहे. यात मागील ४ वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारक पैसे आणि रेशन यांचे प्रलोभन देऊन महिलांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. अशा धर्मांतरितांची हिंदु धर्मामध्ये ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जागरण मंचच्या प्रांत सहसंयोजक सौ. ज्योती शर्मा यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चतुर्थ दिवशी केले.
‘छत्तीसगडमध्ये धर्मांतराची ‘मोडस ऑपरेंडी’ (व्यक्ती किंवा समूह यांची कार्य करण्याची विशिष्ट पद्धत) या विषयावर बोलतांना सौ. शर्मा म्हणाल्या, ‘‘प्रत्येक घरामध्ये काहीतरी अडचणी असतात. या अडचणींचा ख्रिस्ती धर्मप्रचारक अपलाभ घेतात. ते धर्मांतरासाठी हिंदु महिलांना आर्थिक लाभ, तर मुलांना शिक्षण आणि नोकरी यांचे प्रलोभन देतात. त्यासाठी त्यांना जवळच्या चर्चमध्ये बोलावण्यात येते. त्याप्रमाणे घरातील पुरुष कामावर गेल्यावर या महिला दुपारच्या वेळी चर्चमध्ये जातात. तेथे गेल्यानंतर ‘तुमचे देव चांगले नाहीत’, असे सांगण्यात येते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु महिला देवपूजा करणे आणि तुळशीपूजन करणे थांबवतात. दुसर्या रविवारपासून पीडित महिलांना पैसे आणि रेशन मिळणे चालू होते. त्यांचे पूर्ण धर्मांतर झाल्यानंतर ६ मासांनी अशा महिलांना मिळकतीतील १० वा हिस्सा दान करण्यास सांगण्यात येते. ज्यांच्याकडे पैसे नसतात, त्यांना पाद्रयांना रेशन देण्यास सांगण्यात येते. त्यामुळे घरांमध्ये भांडणे चालू होतात. अशा धर्मांतरित हिंदूंची घरवापसी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धर्मांतर केल्याचे पुरावे असल्यास धर्मांतर करणार्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर गुन्हेही नोंद करता येतात.’’