रामनाथी, १८ जून (वार्ता.) – भारतातील शिक्षणसंस्था डाव्या आणि साम्यवादी शक्तींनी पोखरल्या असून त्यांमध्ये देशविरोधी कारवाया चालू आहेत. स्वत:च्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हिंदू पालक पाल्यांना मोठ्या विद्यापिठांत पाठवतात; परंतु ही विद्यापिठे शिक्षणाऐवजी प्रोपोगंडाची (राजकीय प्रचाराची, अतिशयोक्त वर्णन करणारी) स्थाने झाली आहेत. शिक्षणाचा संस्कारांशी असलेला संबंध साम्यवाद्यांनी कधीच काढून टाकला आहे. विद्यापिठांमध्ये भावी पिढीला राष्ट्रविरोधी बनवण्याचे काम चालू आहे. हे रोखण्यासाठी शिक्षण आणि संस्कार देणार्या गुरुकुल शिक्षणपद्धतीचा पुरस्कार आपण करायला हवा. डावे आणि साम्यवादी स्वत:ला मानवतावादी, पर्यावरणवादी दाखवण्याचा प्रयत्न करतात. जगात डाव्यांचा सत्तेत येण्याचा इतिहास रक्तरंजित आहे. त्यामुळे ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’च्या षड्यंत्राकडे हिंदूंनी गांभीर्याने पहायला हवे. अन्यथा भविष्यात भारतविरोधी कारवायांसाठी बाहेरून आक्रमण होण्याची आवश्यकता नाही. हे रोखण्यासाठी या षंड्यंत्राला गांभीर्याने घ्यायला हवे. यासाठी विद्यापिठांमधून राष्ट्रहिताचे आणि भारतीय संस्कृतीचे शिक्षण द्यायला हवे आणि यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे परखड प्रतिपादन श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या तृतीय दिनी (१८.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
या वेळी व्यासपिठावर प्रज्ञा मठ पब्लिकेशनचे लेखक आणि प्रकाशक मेजर सरस त्रिपाठी, कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. आणि मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या श्रीमती सिद्ध विद्या उपस्थित होत्या.