तिलारी धरणाची उंची वाढवणार
पणजी, १७ जून (वार्ता.) – म्हादईप्रश्नी आम्ही कर्नाटकशी एकत्रित लढू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ‘तिलारी’ नियंत्रण मंडळाची तब्बल १० वर्षांनी मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. गोव्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सातत्याने फुटणारे कालवे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि तिलारीविषयी अन्य महत्त्वाची सूत्रे यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. बैठकीमध्ये तिळारी धरणाची उंची वाढवण्याअगोदर अभ्यास करणे, धरणग्रस्त २२ कुटुंबांना प्रत्येक ५ लाख रुपये भरपाई देणे आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.