कराड येथे १८ जून या दिवशी राज्‍यस्‍तरीय मराठा अधिवेशन !

‘अखिल भारतीय मराठा महासंघा’चे जिल्‍हाध्‍यक्ष अनिल घराळ

कराड, १६ जून (वार्ता.) – कराड तालुका सकल मराठा समाजाच्‍या वतीने १८ जून यादिवशी कराड येथे राज्‍यस्‍तरीय मराठा समाज अधिवेशन आयोजित करण्‍यात आले आहे. सौ. वेणूताई चव्‍हाण येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार्‍या या अधिवेशनाला २५ जिल्‍ह्यांतील समन्‍वयक, अभ्‍यासक आणि व्‍याख्‍याते उपस्‍थित रहाणार आहेत, अशी माहिती ‘अखिल भारतीय मराठा महासंघा’चे जिल्‍हाध्‍यक्ष अनिल घराळ यांनी दिली. येथील मराठा महासंघाच्‍या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी संघाचे इतर पदाधिकारी उपस्‍थित होते.

जिल्‍हाध्‍यक्ष घराळ पुढे म्‍हणाले की, राज्‍यभरात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. वास्‍तविक ५० टक्‍क्‍यांवरील आरक्षण कायद्याच्‍या पातळीवर टिकणारे नाही. यासाठी ५० टक्‍क्‍यांच्‍या आतले ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळायला पाहिजे. या मागणीसाठी मराठा समाजाला जागृत करणे आवश्‍यक आहे. समाजाची वज्रमूठ बांधण्‍यासाठी हे अधिवेशन घेण्‍यात येत आहे. मराठा समाजाला घटनात्‍मक आरक्षण कसे मिळेल ? याविषयी अधिवेशनामध्‍ये विचारमंथन होणार आहे. अधिवेशनाच्‍या शेवटी ठराव करण्‍यात येणार आहेत. अधिवेशनासाठी येणार्‍या वाहनांना पथकरमुक्‍ती देण्‍यात आली आहे.