जुन्नर (जिल्हा पुणे) – पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला निघालेल्या माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांना मेंढ्यांचे रिंगण घातले जाते. हे रिंगण घालण्यासाठी त्या-त्या ठिकाणी सूत्रबद्ध पद्धतीने मेंढ्यांना आणले जाते. दोन्ही बाजूंनी वारकरी उभे राहून मधून मेंढ्यांना पळवले जाते; मात्र जुन्नरमध्ये एक अनोखा रिंगण सोहळा पहायला मिळाला. ओझर येथील शिव चिदंबर महाराजांच्या दिंडीचे १३ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या वेळी ओझर-ओतूर रस्त्यावर ठिकेकरवाडी जवळ दिंडी जात असतांना मागून एक मेंढ्यांचा कळप आला. या कळपाने अगदी अनाहूत पद्धतीने या दिंडीला गोल रिंगण घातले. अनेकांनी हे दृश्य भ्रमणभाषमध्ये चित्रित केले.