वारकर्‍यांवर लाठीमार प्रकरणी कुणीही राजकारण करू नये ! – आळंदी देवस्‍थान

आळंदी (जिल्‍हा पुणे) – आनंदाच्‍या सोहळ्‍याला गालबोट लागले आहे. १२ जूनला घडलेल्‍या घटनेत आळंदी देवस्‍थानाचा संबंध नव्‍हता. हा प्रकार अपसमजातून झाला आहे. एकूण ४७ दिंड्या आहेत, त्‍यामधील ७५ वारकर्‍यांना ‘पास’ दिले होते. वारकरी शिक्षण संस्‍थेतील मुलांनाही देवस्‍थानचे पास दिले होते; मात्र अधिक संख्‍या असल्‍याने त्‍यांनी हट्ट केला. मुले वारकरी म्‍हणून हट्ट करत होती आणि कायदा सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी पोलीस काम करत होते. चुका शोधत बसण्‍यापेक्षा सुधारणा करूयात. वारकर्‍यांवर लाठीमार प्रकरणी कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन आळंदी देवस्‍थानकडून करण्‍यात आले आहे. येथे पालखी प्रस्‍थानच्‍या कार्यक्रमाच्‍या पहिल्‍याच दिवशी गर्दी झाल्‍याने पोलिसांनी वारकर्‍यांना मंदिरात प्रवेश करण्‍यापासून रोखले होते. या वेळी वारकर्‍यांवर लाठीमार झाल्‍याचा आरोप झाला होता.