१४ वर्षीय अल्‍पवयीन मुलीवर ५० वेळा अत्‍याचार झाल्‍याची वैद्यकीय पडताळणीतील माहिती !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – शहरात एका १४ वर्षांच्‍या मुलीवर ६ जणांनी अत्‍याचार केल्‍याची घटना ५ दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणात आणखी एक धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. गेल्‍या ६ मासांपासून हा सर्व प्रकार चालू होता, ज्‍यात या १४ वर्षीय अल्‍पवयीन मुलीवर ४० ते ५० वेळा अत्‍याचार करण्‍यात आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय पडताळणीतून निष्‍पन्‍न झाली आहे.

शहरातील एका १४ वर्षांच्‍या मुलीचा अश्‍लील व्‍हिडिओ काढून ब्‍लॅकमेल करत तिच्‍यावर ६ जणांनी आळीपाळीने अत्‍याचार केला आहे. पोलिसांनी एकूण ६ जणांविरोधात विधीसंघर्षग्रस्‍त बालकावर बाललैंगिक अत्‍याचार प्रतिबंधक, तसेच आयटी कायद्यानुसार गुन्‍हा नोंद केला होता. पीडित मुलीला वैद्यकीय पडताळणीसाठी शासकीय घाटी रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले होते. या वेळी पीडित मुलीने स्‍वतःवर झालेल्‍या अत्‍याचाराची आपबिती सांगितली. रात्री-अपरात्री नराधमांनी मला धमकावून घराबाहेर बोलावले. निर्मनुष्‍य ठिकाणी नेत ४० ते ५० वेळा अत्‍याचार केला, अशी माहिती या पीडितेने दिली.

अल्‍पवयीन आरोपींची बालगृहात रवानगी !

पीडित मुलीवर ६ जणांनी ऑक्‍टोबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत अत्‍याचार केला. प्रारंभी विश्‍वासू मित्राने अत्‍याचार करून त्‍याचे भ्रमणभाषमध्‍ये चित्रण केले. ते प्रसारित करण्‍याची धमकी देत नात्‍यातील एका तरुणासह अन्‍य मित्रांना या कृत्‍यात सहभागी करून घेतले. त्‍यानंतर पीडित मुलीला व्‍हिडिओ प्रसारित करण्‍याची धमकी देत सतत तिच्‍यावर अत्‍याचार केला. त्‍यामुळे नेहमीच्‍या त्रासाला कंटाळून तिने पोलीस ठाण्‍यात धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला. त्‍यानंतर सातारा पोलिसांनी अक्षय चव्‍हाण, शेख लतीफ उपाख्‍य असीम पठाण आणि रामेश्‍वर गायकवाड यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करून अटक केली आहे, तर अल्‍पवयीन आरोपींची बालगृहात रवानगी करण्‍यात आली आहे. शासकीय बालगृहात असलेल्‍या पीडितेचा पोलीस जबाब नोंदवत आहेत. पोलीस आता तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत. तिने सांगितलेल्‍या सर्व ठिकाणांवर पोलिसांनी पहाणीही केली. या गुन्‍ह्यात वापरण्‍यात आलेली अक्षय याची कार पोलिसांनी जप्‍त केली आहे.

संपादकीय भूमिका

मुलींवर अत्‍याचार करणार्‍यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या शासनकाळात असलेली चौरंगा करण्‍याची शिक्षा करण्‍याची मागणी कुणी केल्‍यास आश्‍चर्य वाटू नये. छत्रपतींच्‍या महाराष्‍ट्रात मुलींवर अत्‍याचारांची परिसीमा गाठणे लज्‍जास्‍पद !