अधिकार्यांची अनेक पदे रिक्त
सातारा, ११ जून (वार्ता.) – जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट असूनही अनेक पदे रिक्त आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे अर्थ, आरोग्य, सामान्य प्रशासन आणि ग्रामीण विकास यंत्रणेचा समावेश आहे. विशेष म्हणजे या विभागांचा कारभार सध्या प्रभारी अधिकारी पहात आहेत. त्यामुळे या अधिकार्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. गत ५ मासापासून ही स्थिती असल्याचे जिल्हा परिषदेमधील कर्मचारी सांगत आहेत.
जिल्ह्याचे छोटे मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेची ओळख असते. जिल्हा परिषदेमध्ये १५ हून अधिक विभाग कार्यरत आहेत. या विभागांसाठी स्वतंत्र अधिकारी असतात; परंतु सध्या सातारा जिल्हा परिषदेतील अनेक विभाग अधिकार्यांविना कार्यरत आहेत. त्यामुळे एका अधिकार्याकडे दुसर्या विभागाचा पदभार सोपवण्यात आला आहे. यामुळे संबंधित अधिकार्याची तारांबळ उडत आहे. संबंधित विभागांची कामे चालू असली, तरी ती अत्यंत संथ गतीने चालू आहेत. विभागाला न्याय देण्यासाठी आणि कामांना गती प्राप्त होण्यासाठी प्रशासनाने पूर्णवेळ अधिकार्यांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा कर्मचारी वर्ग व्यक्त करत आहे.
संपादकीय भूमिकापदे रिक्त का ठेवली जातात ? यामुळे जनतेला सुविधा मिळत नाहीत, तसेच आहे त्यांना अधिक काम करावे लागते, याला कोण उत्तरदायी ? पदे रिक्त ठेवण्यास कारणीभूत असणार्यांना कठोर शिक्षा द्यायला हवी ! |