आळंदी (पुणे) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वी वारकरी आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाला अन् पोलिसांनी वारकर्यांवर सौम्य लाठीमार केला. यानंतर याच प्रकरणाची दुसरी बाजू समोर आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मंदिरात प्रवेश मिळण्यावरून वाद झाल्यानंतर वारकर्यांनी पोलिसांना ढकलल्याचे समोर येत आहे. पोलिसांच्या अंगावर पाय ठेवून वारकरी पुढे सरकत होते. पोलीस आणि वारकरी आळंदीतील चौकात आले. त्यानंतरचे व्हिडिओ प्रसारित झाले; मात्र ‘आम्ही लाठीमार केला नाही’, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मंदिरातील प्रवेशावरून हा वाद झाला होता. पालखी प्रस्थानाच्या वेळी केवळ मानाच्या पालख्यांनाच प्रवेश दिला जातो. याच मानाच्या दिंड्या मंदिराच्या जवळ असतात; मात्र ऐनवेळी या दिंडीतील मोजक्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे दिंडीतील अन्य वारकरी अप्रसन्न झाले. ते मंदिरात जाण्यासाठी गर्दी करत होते. याच वेळी पोलीस आणि दिंडीतील वारकरी यांच्यात वाद झाला होता.