उत्साहपूर्ण वातावरणात घेतले भाविकांनी पालख्यांचे दर्शन !
पुणे, १३ जून (वार्ता.) -संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद़्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे येथे विसाव्यासाठी आल्यावर भक्तांनी पालखी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. पालखीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकर्यांना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत. यामध्ये तरुण डॉक्टरांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. याचसमवेत महापालिकेकडून पालखी विसाव्याच्या ठिकाणी स्वच्छताही केली जात असून स्वच्छतागृहांचीही व्यवस्था आहे. ‘एआयएस्एस्एम् सीओपी’ या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे, तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून काही शीख बांधवांनी चहा आणि पोहे यांचे वाटप केले. भक्तांची गैरसोय होऊ नये; म्हणून पोलीस त्यांना मार्गदर्शन करत आहेत. ‘पालखीमुळे वाहतूक मार्गात पालट केला असला, तरीही पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्याने पालखी दर्शनासाठी येता आले’, अशी प्रतिक्रिया उपस्थित भाविकांनी दिली.