कोल्हापूर – ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम १३ जूनला दुपारी ४ वाजता तपोवन मैदान येथे होणार असून या उपक्रमासाठी जिल्ह्यातील ४० सहस्र लाभार्थी उपस्थित रहाणार आहेत. तरी यातील एकाही लाभार्थ्याची गैरसोय होऊ नये यांसाठी प्रशासनाने अल्पाहार, पाणी, भोजन, वाहतूक, आरोग्य पथक यांसह सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.
या प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री यांचे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे, कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.