अध्‍यात्‍मात प्रगतीसाठी सहायक क्षमता

॥ श्रीकृष्‍णाय नम: ॥

पू. अनंत आठवले

अध्‍यात्‍मात ध्‍येयप्राप्‍तीचे वेगवेगळे मार्ग आहेत. प्रगती व्‍हायला प्रत्‍येक मार्गात वेगवेगळी क्षमता कामी येते. त्‍या क्षमता थोडक्‍यात पुढे दिल्‍या आहेत. आपल्‍यात कोणती क्षमता अधिक आहे ते ओळखून आपल्‍याला मानवणारी साधना केल्‍यास आध्‍यात्मिक प्रगती लवकर होण्‍याची शक्‍यता वाढेल.

१. ईश्‍वरप्राप्‍तीसाठी ‘एक कोटी जप करीन’, ‘बारा वर्षे तप करीन’, असल्‍या खटाटोपापेक्षा ईश्‍वराप्रती भक्‍तीभाव आणि ईश्‍वरप्राप्‍तीचा ध्‍यास, ईश्‍वरप्राप्‍तीसाठी तळमळ अधिक कामी येते.

२. कर्मांनी आध्‍यात्मिक प्रगतीसाठी निष्‍कामता असावी लागते. काम पूर्ण उत्‍साहाने, दक्षतेने करायचे; दुसर्‍यांच्‍या भल्‍यासाठी करायचे; ज्‍याचे भले केले, त्‍याच्‍यापासून परतफेडीची अपेक्षाच नसावी; ते कर्म यशस्‍वी झाले किंवा अयशस्‍वी झाले तरी सुख-दु:ख न होेणे (अलिप्‍तता); असा जो कर्मयोग असतो, तो पूर्ण निष्‍कामता साधण्‍यासाठी असतो. महत्त्व कर्माचे नाही, निष्‍कामतेचे आहे.

३. समाधीसाठी चित्ताची एकाग्रता महत्त्वाची असते. पातञ्‍जल अष्‍टांगयोगातील पहिली पाच अंगे – यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्‍याहार, ही मुख्‍यत: पूर्वसिद्धता आहे. पुढची दोन अंगे-धारणा आणि ध्‍यान, हे चित्ताच्‍या एकाग्रतेचे प्रयत्न आहेत. शेवटच्‍या अंगात म्‍हणजे समाधीत चित्ताची एकाग्रता झालेली असते.

४ अ. आत्‍मज्ञानप्राप्‍तीसाठी अत्‍यंत तीव्र जिज्ञासा असावी लागते. जाणेपर्यंत मन अगदी अस्‍वस्‍थ राहिले तर जिज्ञासा पूर्ण करण्‍यासाठी अथक प्रयास होतात आणि ते यशस्‍वीही होतात.

४ आ. ब्रह्मलीन होण्‍यासाठी वैराग्‍य आणि तीव्र मुमुक्षुत्‍व असायला हवे. मग प्राप्‍त आत्‍मज्ञानाची प्रत्‍यक्ष अनुभूती, प्रचीती येऊन सर्व इच्‍छांसह मोक्षप्राप्‍तीची इच्‍छासुध्‍दा लोप पावून मनुष्‍य कामनाशून्‍य होतो आणि ब्रह्मलीन होण्‍याची योग्‍यता येते.

– अनंत आठवले. २५.०५.२०२३

।। श्रीकृष्णापर्णमस्तु ।।

पू. अनंत आठवले यांच्‍या लिखाणातील चैतन्‍य न्‍यून न होण्‍यासाठी घेतलेली काळजी

लेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्‍याने त्‍यांच्‍या लिखाणात चैतन्‍य आहे. ते चैतन्‍य न्‍यून होऊ नये; म्‍हणून त्‍यांच्‍या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्‍याकरण यांत पालट केलेले नाहीत.