आषाढी वारीसाठी प्रस्‍थान सोहळ्‍याची देहू आणि आळंदीतील संस्‍थानकडून जय्‍यत सिद्धता !

संत तुकाराम महाराज

देहू (जिल्‍हा पुणे) – आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्‍या ४ दिवसांवर आहे. जगद़्‍गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्‍या १० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्‍थान ठेवणार आहे. या पार्श्‍वभूमीवर देहू आणि आळंदी संस्‍थानने जय्‍यत सिद्धता केली आहे. पालखी सोहळ्‍यात सहभागी होणार्‍या दिंडीतील वारकर्‍यांना पिण्‍याचे स्‍वच्‍छ पाणी, आरोग्‍य सेवा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी संत तुकाराम महाराज संस्‍थानने विशेष काळजी घेतली आहे.

याविषयी पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे म्‍हणाले की, पालखी सोहळ्‍यातील चांदीचा रथ, अब्‍दागिरी यांना पॉलीश करण्‍यात आले आहे. पालखी सोहळ्‍यात ३२९ दिंड्यांची नोंद आहे. नव्‍याने ४५ दिंड्या सोहळ्‍यात सहभागी होणार आहेत. सोहळ्‍यातील सर्व दिंडीप्रमुखांना संस्‍थानने पत्रव्‍यवहार केला आहे. तसेच वाहनांसाठी पास देणे चालू आहे. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्‍ध व्‍हाव्‍यात यासाठी पाणी, आरोग्‍य, वीज, रस्‍ते विभागाला पत्रव्‍यवहार केला आहे. पालकमंत्री आणि विभागीय आयुक्‍त यांना पालखी मार्गावरील समस्‍यांविषयी माहिती दिली आहे. मानकरी, सेवेकरी, दिंडी प्रमुख यांना पत्रव्‍यवहार केला आहे. शासनाकडून विविध सोयीसुविधा देण्‍यासाठी कळवले आहे. पालखी मार्गावर निवार्‍यासाठी तंबूची व्‍यवस्‍था केली आहे. पालखी मार्गावरील अन्‍नदानासाठी लागणारे साहित्‍य खरेदी केले आहे.