‘ब्राह्मण’ नाव कोणाचे आहे ? (ब्राह्मण कोणाला म्हणावे ?)  

।। श्रीकृष्णाय नम: ।।

वज्रसूचिकोपनिषद्मध्ये ‘ब्राह्मण कोणाला म्हणावे?’ असा प्रश्न उपस्थित करून वेगवेगळ्या शक्यता सांगून त्यांचे निराकरण केले आहे. शेवटी ब्राह्मण नाव कोणाचे आहे, हे स्पष्ट केले आहे. जिज्ञासूंसाठी ही माहिती पुढे दिली आहे.  मूळ संस्कृत आणि त्याचा अर्थ दिल्यास विस्तार खूप वाढेल, म्हणून ही माहिती पुढे केवळ मराठीत दिली आहे. मूळ उपनिषद् ज्या पद्धतीने लिहिलेले आहे, साधारणत: त्याच पद्धतीने पुढे माहिती दिली आहे. क्वचित् किंचित् संक्षिप्त केले आहे. ह्यात प्रस्तुतकर्त्याचे विवेचन नाही.

पू. अनंत आठवले

‘चार वर्णांमध्ये ब्राह्मण मुख्य आहे, असे वेद आणि स्मृतींमध्ये सुद्धा सांगितले आहे. त्याविषयी शंका येते की ब्राह्मण नाव कोणाचे आहे? जीव, देह, जात, ज्ञान, कर्म, धार्मिक  (व्यक्ती) ह्यांच्यापैकी कोण ब्राह्मण आहे?’

जीव – ‘जीव ब्राह्मण असू शकत नाही कारण आधींच्या आणि पुढे होणार्‍या अनेक वेगवेगळ्या शरीरांमध्ये जीव तोच असतो. तो कर्मांमुळे अनेक शरीरे धारण करतो, परंतु सर्व शरीरांमध्ये जीव एकच असतो.’

देह – ‘देह ब्राह्मण असू शकत नाही. सर्व मनुष्यांचे देह पंचमहाभूतांचेच बनलेले असतात आणि त्या देहांना वृद्धत्व, मृत्यू सारखेच असतात. ब्राह्मण गोरा, क्षत्रिय लाल, वैश्य पिवळा, शूद्र काळाच असेल, असा सुद्धा नियम नाही. देहाला ब्राह्मण मानले तर वडिलांच्या मृत शरीराला अग्नी दिल्याने मुलाला ब्रह्महत्या केल्याचे पाप लागण्याची शक्यता राहील.’

जात – ‘जात ब्राह्मण आहे, असे असू शकत नाही. विभिन्न जातींच्या प्राण्यांपासून अनेक जातींचे महर्षी उत्पन्न झाले आहेत; जसे हरिणीपासून ऋष्यश्रृंग, कुशापासून कौशिक, जम्बूक(कोल्हा)पासून जाम्बूक, नावाड्याच्या मुलीपासून व्यास, सश्याच्या पाठीपासून गौतम, उर्वशीपासून वसिष्ठ, कलशापासून अगस्त्य उत्पन्न झाले असे ऐकिवात आहे. ह्यांच्यातील अनेक जण जातीविना सुद्धा आधी पूर्ण ज्ञानवान् ऋषी झाले आहेत. म्हणून जात ब्राह्मण नाही’.

ज्ञान – ‘ज्ञान ब्राह्मण आहे असे होऊ शकत नाही. कित्येक क्षत्रिय (जनक, अश्र्वपती) इत्यादी सुद्धा परमार्थाला जाणणारे तत्त्वज्ञ झाले आहेत’.

कर्म – ‘कर्म ब्राह्मण असू शकत नाही. सर्व प्राण्यांमध्ये प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण कर्मांमध्ये सारखेपणा दिसून येतो आणि कर्मांनी प्रेरित होऊन माणसे क्रिया करतात. म्हणून कर्म ब्राह्मण नाही.’

धार्मिक – ‘धार्मिक (आहे ह्या आधारावर व्यक्ती) ब्राह्मण असू शकत नाही. कित्येक क्षत्रिय इत्यादी सुद्धा सोन्याचे दान करणारे झाले आहेत.’

‘मग ब्राह्मण कोणाचे नाव आहे? जो कोणी अद्वितीय आत्मा जाती, गुण आणि क्रियाने रहित आहे, सहा ऊर्मी (टीप १) आणि सहा विकार (टीप २) इत्यादी सर्व दोषांनी रहित, सत्-चित्-आनंद एवं अनंतस्वरूप, निर्विकल्प असून अनंत कल्पांचा आधार, अनंत प्राण्यांमध्ये अंतर्यामीरूपाने राहणारा, नित्य अस्तित्ववान्, आकाशाप्रमाणे सर्वांच्या आत-बाहेर परिपूर्ण, अखंड आनंद स्वभावाचा, अप्रमेय (इंद्रिये आणि अंत:करणाने न जाणला जाणारा), केवळ अनुभवाने जाणण्यायोग्य, प्रत्यक्ष प्रकाशित होणारा, तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे परमात्म्याचा साक्षात्कार करुन कृतकृत्य झालेला, काम-अनुराग इत्यादी दोषांनी रहित, शमदमसंपन्न; मत्सर, तृष्णा, आशा, मोह इत्यादी नसलेला आणि ज्याचे चित्त दंभ, अहंकार इत्यादी दोषांनी निर्लिप्त आहे तोच वास्तविक ब्राह्मण आहे असा श्रुती, स्मृती, पुराण आणि इतिहासाचा अभिप्राय आहे. ह्या व्यतिरिक्त दुसर्‍या कोणत्याही प्रकारे ब्राह्मणत्व सिद्ध होत नाही.’

टीप १ – सहा ऊर्मी : – तहान-भूक, शोक-मोह, वृद्धत्व- मृत्यू.

टीप २ – सहा विकार : – उत्पत्ती, वृद्धी, स्थिती, परिवर्तन, ह्रास, नाश.

प्रस्तुतकर्ता – अनंत आठवले. ०४.०५.२०२३

।। श्रीकृष्णापर्णमस्तु ।।

पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून न होण्यासाठी घेतलेली काळजी

लेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत.