राज्‍यातील १११ साखर कारखान्‍यांकडे १ सहस्र १९९ कोटी रुपयांची ‘एफ्.आर्.पी.’ रक्‍कम थकित !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – यंदा राज्‍यात २१० साखर कारखान्‍यांनी १०५३.६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्‍यापोटी शेतकर्‍यांना एकूण ३४ सहस्र ५४२ कोटी रुपयांचे रास्‍त आणि किफायतशीर दराचे (‘एफ्.आर्.पी.’) देणे होते. त्‍यांपैकी ३३ सहस्र २४३ कोटी रुपये दिले आहेत; मात्र अद्यापही ३.४७ टक्‍के म्‍हणजेच १ सहस्र १९९ कोटी रुपयांची रक्‍कम १११ साखर कारखान्‍यांनी अजून दिलेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.

१. राज्‍यातील २१० पैकी ९९ साखर कारखान्‍यांनी ‘एफ्.आर्.पी.’ची रक्‍कम पूर्ण दिलेली आहे. ९० टक्‍क्‍यांहून अधिक रक्‍कम देणारे ८६ साखर कारखाने आहेत. ६० टक्‍क्‍यांहून अधिक देणारे १६, तर ६० टक्‍क्‍यांहून अल्‍प ‘एफ्.आर्.पी.’ देणारे ९ कारखाने आहेत.

२. या ९ कारखान्‍यांना साखर आयुक्‍तालयाने आर्.आर्.सी.ची नोटीस बजावली आहे.

३. राज्‍यात ‘इथेनॉल’ निर्मिती करण्‍याची वार्षिक क्षमता २४४ कोटी लिटर आहे. तेल उत्‍पादक आस्‍थापनांना ‘इथेनॉल’चा पुरवठा केल्‍यानंतर २१ दिवसांमध्‍ये ते साखर कारखान्‍यांना पैसे देतात. त्‍यातून ‘एफ्.आर्.पी.’ची रक्‍कम दिली जाते. अनेक कारखान्‍यांनी ऊस गाळप झाल्‍यानंतर १० दिवसांमध्‍ये ही रक्‍कम शेतकर्‍यांना दिल्‍याची माहिती साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्‍यात येत आहे.

संपादकीय भूमिका

रक्‍कम कोट्यवधी रुपये इतकी जाईपर्यंत साखर आयुक्‍तालय काय करत होते ?