परभणी येथे छेड काढणार्‍या धर्मांधाला मारहाण केल्‍याप्रकरणी मुलीवर आणि तिला साहाय्‍य करणारे यांवर गुन्‍हा नोंद !

प्रतीकात्मक छायाचित्र

परभणी – येथील परभणी-पाथरी रस्‍त्‍यावरील असलेल्‍या एका अभ्‍यासिकेमधून अभ्‍यास करून जाणार्‍या विद्यार्थिनीची छेड काढली म्‍हणून एका धर्मांधाला मारहाण करण्‍याची घटना घडली; परंतु या घटनेत ज्‍या मुलीची छेड काढली त्‍याच मुलीवर मारहाणीचा गुन्‍हा नोंदवण्‍याचा प्रताप मानवत पोलिसांकडून करण्‍यात आला आहे. याविषयी सर्वत्र आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे. पोलिसांनी मुलीवर गुन्‍हा नोंदवण्‍याची कारवाई म्‍हणजे ‘मुलींनो,  छेड काढली तरी शांत बसा’, असा संदेश देणारी ठरली आहे.

५ जून या दिवशी सायंकाळी ७ वाजता रामेटाकळी येथील एक विद्यार्थिनी महाविद्यालयाच्‍या बाजूला असलेल्‍या अभ्‍यासिकेमधून घराकडे जात होती. त्‍याच वेळी उड्डाण पुलाजवळ हतलवाडी येथील शेख शाकिब शेख अहमद आणि सतीश धबडगे या २ तरुणांनी तिची छेड काढली, तसेच तिला अश्‍लील भाषेत ते दोघे बोलले. यावरून संतप्‍त झालेल्‍या तरुणीने त्‍यातील शेख शाकिब शेख अहमद तरुणास मारहाण करण्‍यास प्रारंभ केला. त्‍या वेळी दुसरा तरुण सतीश पळून गेला. शेख हा त्‍या मुलीच्‍या आणि ये-जा करणार्‍या रस्‍त्‍यावरील मुलांच्‍या तावडीत सापडला. त्‍याला चोप देत पोलिसांच्‍या स्‍वाधीन करण्‍यात आले. पोलीस ठाण्‍यामध्‍ये त्‍याच्‍यावर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला; परंतु ६ जूनच्‍या पहाटे ३ वाजण्‍याच्‍या सुमारास मानवत पोलिसांनी या घटनेत दुसरा गुन्‍हा नोंद करत ज्‍या मुलीची छेड काढली आहे, त्‍या मुलीला आरोपी करत तिच्‍यावरही गुन्‍हा नोंद केला.

तरुणाने तक्रार दिल्‍याने गुन्‍हा नोंद केला ! 

याविषयी पोलीस निरीक्षक रमेश स्‍वामी म्‍हणाले की, सामाजिक माध्‍यमांवर आलेल्‍या चित्रफीतीमध्‍ये त्‍या तरुणास पोलीस प्रशासनाच्‍या कह्यात न देता कायदा हातात घेत काही जणांनी मारहाण केली, असे दिसून आले. मारहाणीत घायाळ तरुणाने दिलेल्‍या तक्रारीनुसार आम्‍हाला त्‍या मुलीचे नाव आरोपीमध्‍ये घ्‍यावे लागले.

५ जून या दिवशी ही घटना घडल्‍यानंतर मानवत पोलीस ठाण्‍यात परस्‍परविरोधी गुन्‍हे नोंद करण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये शेख शाकीब शेख अहमद याच्‍या तक्रारीवरून पीडित मुलीसह कार्तिक बाकळे, विष्‍णु गोरे, किरण नांदुरे आणि महेश जाधव यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे, तर पीडित मुलीच्‍या तक्रारीवरून शेख शकीब शेख अहमद आणि सतीश धबडगे यांच्‍यावर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

मुलीने स्‍वसंरक्षणासाठी मारले त्‍यात गैर काय ? – मेघना बोर्डीकर, आमदार, भाजप

याविषयी भाजपच्‍या आमदार मेघना बोर्डीकर म्‍हणाल्‍या की, त्‍या पीडित मुलीने स्‍वसंरक्षणासाठी त्‍या छेड काढणार्‍या तरुणास मारले असेल, तर त्‍यात गैर काही नाही. मी या प्रकरणात पोलीस अधीक्षकांना त्‍या पीडित मुलीवरील गुन्‍हा मागे घेण्‍याची मागणी करणार आहे. या प्रकरणाची गृह खात्‍याच्‍या उच्‍चपदस्‍थ अधिकार्‍यांकडून चौकशीची मागणीही उपमुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे करून पाठपुरावा करू.

संपादकीय भूमिका

छेड काढणार्‍या धर्मांधाला चोप देणार्‍या मुलीवर गुन्‍हा नोंद होणे, हे छत्रपतींच्‍या महाराष्‍ट्राला लज्‍जास्‍पद आहे ! अशाने मुली धर्मांधांचा प्रतिकार करायला कधी तरी पुढे येतील का ?

छेड काढणार्‍या धर्मांधाला प्रतिकार करणार्‍या हिंदु मुलीवर गुन्‍हा नोंदवणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !