महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात नृत्‍यकलाकार नृत्‍याच्‍या माध्‍यमातून देवाला अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात ! – डॉ. सहना भट, संस्‍थापिका ‘नाट्यांजली कला केंद्र’, हुब्‍बळ्ळी, कर्नाटक

हुब्‍बळ्ळी, कर्नाटक येथील ‘नाट्यांजली कला केंद्रा’च्‍या संस्‍थापिका डॉ. सहना भट (भरतनाट्यम् नृत्‍यांगना) यांनी वर्ष २०२२ मध्‍ये महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाला भेट दिली होती. त्‍या वेळी येथे झालेल्‍या नृत्‍याच्‍या संशोधनात्‍मक प्रयोगांमध्‍ये त्‍या सहभागी झाल्‍या होत्‍या. त्‍यानंतर डॉ. सहना भट यांची कर्नाटक येथील वेणुध्‍वनी के.एल्.ई. या आकाशवाणी केंद्रावर मुलाखत घेतली. या मुलाखतीचा विषयच डॉ. सहना यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाला दिलेल्‍या भेटीच्‍या कालावधीत ‘नृत्‍य आणि साधना’ या विषयाला धरून त्‍यांनी अनुभवलेल्‍या गोष्‍टी, त्‍यांना या वेळी आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती आणि त्‍यांच्‍या लक्षात आलेली सूत्रे, असा होता. या मुलाखतीचा सारांश भाग डॉ. सहना भट यांच्‍याच शब्‍दांत खालील लेखामध्‍ये दिला आहे.

डॉ. सहना भट

१. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात नृत्‍यकलाकार नृत्‍याच्‍या माध्‍यमातून देवाला अनुभवण्‍याचा प्रयत्न करत असून येथे नृत्‍य करतांना विविध दिव्‍य अनुभूती येणे

‘गोवा येथील ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राच्‍या ठिकाणी नृत्‍य करणे’, हा माझ्‍यासाठी एक उत्तम आणि निराळा अनुभव होता. येथे गायन, वादन आणि नृत्‍य या संबंधी संशोधन कार्य चालू आहे. या संशोधनासाठी ४-५ दिवस तेथे गेल्‍यावर मला आलेला अनुभव निराळाच होता. गायन, वादन आणि नृत्‍य हे देवाच्‍या कार्यासाठीच आहेत. काही जण हे लहानपणापासून शिकत आले आहेत. नृत्‍याच्‍या माध्‍यमातून आपण देवाची आराधनाच करत असतो. नृत्‍य म्‍हणजे ‘एका रितीने देवाची पूजा करणेच आहे !’, असे मला वाटते. ती मानस पूजा अथवा दैहिक पूजा असू शकते. येथे नृत्‍यकलाकार नृत्‍याच्‍या माध्‍यमातून देवाला अनुभवण्‍याचा प्रयत्न करतो. एखादी नृत्‍यातील मुद्रा केल्‍यावर ‘अंतर्मनाला काय जाणवते ?’, याचा अभ्‍यास करतो. मी ही अशा वातावरणात वाढली आहे. बाहेरील काही कलाकारही अल्‍पाधिक प्रमाणात हीच भावना बाळगून असतात. याच दृष्‍टीकोनातून नृत्‍याच्‍या संशोधनात्‍मक प्रयोगांसाठी त्‍यांनी मला बोलावले आणि मला पुष्‍कळ दिव्‍य अनुभव घेता आले.

२. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा पाहिल्‍यावर त्‍यांच्‍या डोळ्‍यांत भगवंताचे तेज असल्‍याचे जाणवणे आणि त्‍यांच्‍यामुळेच संशोधनाचे अफाट कार्य होत असल्‍याचे लक्षात येणे

ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये मी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात गेले होते. त्‍या वेळी मी सनातन आश्रमालाही भेट दिली. तेथे श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांच्‍या मूर्ती आहेत. आश्रमातील स्‍पंदने पुष्‍कळ चांगली आहेत. आम्‍हाला तेथील विविध कार्याचा परिचय करून देण्‍यात आला. हे सर्व पहातांना मला एक दिव्‍य अनुभूती आली. आश्रमातील ध्‍यानमंदिरात महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा आहे. ते या विश्‍वविद्यालयाचे संस्‍थापक आहेत, हे मला ठाऊक नव्‍हते; परंतु ‘त्‍यांचे केवळ छायाचित्र पहाताच त्‍यांच्‍या डोळ्‍यांत भगवंताचे विलक्षण तेज आहे’, असे मला जाणवले. त्‍यानंतर मला समजले की, ‘हेच महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संस्‍थापक असून त्‍यांच्‍यामुळेच एवढे संशोधन करणे सुलभ होत आहे.’

३. ‘जी.डी.व्‍ही’ या वैज्ञानिक उपकरणाच्‍या माध्‍यमातून मनुष्‍याच्‍या सप्‍तचक्रांच्‍या स्‍थितीचा अभ्‍यास कसा करता येतो ?’, हे समजणे

सौ. सावित्री इचलकरंजीकर (नृत्‍य अभ्‍यासिका, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय) यांनी आम्‍हाला काही संशोधनात्‍मक यंत्रांचा परिचय करून दिला आणि महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात आतापर्यंत झालेल्‍या ७०० हून अधिक संशोधनात्‍मक प्रयोगांविषयीची माहिती पॉवर पॉइंट प्रणालीच्‍या (पी.पी.टी.च्‍या) माध्‍यमातून दिली. येथे काही साधकांना सूक्ष्माविषयी ज्ञान आहे. उपकरण आणि सूक्ष्म ज्ञान अशा दोन्‍ही प्रकारे येथे अभ्‍यास केला जातो. यानंतर सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत समन्‍वयक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) यांनी आम्‍हाला सप्‍तचक्रांविषयी माहिती सांगितली.

सप्‍तचक्रांची स्‍थिती पहाण्‍यासाठी ‘जी.डी.व्‍ही’ (Gas Discharge Visualization) या उपकरणाचे साहाय्‍य होते. ‘एखादे नृत्‍य करण्‍यापूर्वी, तसेच नृत्‍य झाल्‍यानंतर सप्‍तचक्रांची स्‍थिती काय ?’ याचा आपण अभ्‍यास करू शकतो. त्‍याचप्रमाणे जेव्‍हा मनुष्‍याची वृत्ती शांत आणि अंतर्मुख असते, तेव्‍हा चक्रांची स्‍थिती कशी असते ? जेव्‍हा आपण अनावश्‍यक गप्‍पा मारतो किंवा वृत्ती बहिर्मुख असते, तेव्‍हा चक्रांची स्‍थिती कशी असते ? हे सर्व उपकरणांच्‍या माध्‍यमातून कसे कळते ?’, या संदर्भात आम्‍हाला माहिती समजली.

४. ‘यु.ए.एस्’ या वैज्ञानिक उपकरणाच्‍या माध्‍यमातून प्रभावळीचा अभ्‍यास कसा होतो ?’, हे समजणे

कोणताही संगीत प्रयोग होण्‍यापूर्वी गायक अथवा नर्तक, प्रेक्षक आणि साथ करणारे वादक यांच्‍याही प्रभावळीचे प्रयोगापूर्वी अन् प्रयोगानंतर ‘यु.ए.एस्. (युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर)’ या उपकरणाच्‍या माध्‍यमातून मीटरमध्‍ये मोजमापन केले जाते. तेथे गेल्‍यावर मला सांगण्‍यात आले की, ‘सामान्‍य माणसाची सकारात्‍मक प्रभामंडल १ मीटरसुद्धा नसते.  साधकाने भक्‍तीमार्गानुसार साधना आणि नामजप केला, तर त्‍याच्‍यातील सकारात्‍मक ऊर्जा त्‍याच्‍या भावानुसार हळूहळू वाढते. या उपकरणाच्‍या माध्‍यमातून मनुष्‍याच्‍या सकारात्‍मक प्रभावळीसह नकारात्‍मक प्रभावळही मोजता येते. यानंतर आम्‍हाला ‘प्रत्‍यक्ष ‘रिडींग’ कसे घेतात ?’, हे दाखवण्‍यात आले. त्‍या वेळी ‘इथे सर्व अभ्‍यास स्‍पंदनशास्‍त्र आणि वैज्ञानिक उपकरणांच्‍या साहाय्‍याने कसा केला जातो ?’, हे आम्‍हाला समजले.

५. ‘आध्‍यात्मिक दृष्‍टीकोनातून नृत्‍य’ हा दृष्‍टीकोन शिकायला मिळणे

अ. ‘भरतनाट्यम्’ म्‍हटले की, आम्‍ही ‘नृत्‍याकडे केवळ तांत्रिक दृष्‍टीने पहातो. ‘नृत्‍य म्‍हणजे काय ? नाट्य म्‍हणजे काय ? त्‍यातील अभिनय आणि अभिव्‍यक्‍ती म्‍हणजे काय ?’, याविषयी मला पुष्‍कळ अनुभव आले आहेत. अनेक संशोधन कार्ये आणि कार्यशाळा यांमध्‍ये मी सहभागी होऊन तेथे नृत्‍य शिकवले आहे. वयाने अगदी लहानांपासून मोठ्या विद्वानांपर्यंत सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळून त्‍यात आम्‍हाला आनंद मिळतो; परंतु आतापर्यंत आम्‍ही केवळ तांत्रिक गोष्‍टीतील आनंदच अनुभवला. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन कार्यात मला एक विशेष अनुभूती आली. इथे आम्‍ही प्रयोगातील प्रत्‍येक गोष्‍टीकडे आध्‍यात्मिक दृष्‍टीने पाहिले. जेव्‍हा प्रयोग चालू झाले, तेव्‍हा सर्वकाही आध्‍यात्मिक दृष्‍टीकोनातून पाहिले जात होते.

आ. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्रात उत्तम चित्रीकरण व्‍यवस्‍था आहे. मी संपूर्ण सिद्ध होऊन प्रयोगस्‍थळी पोचले आणि ‘पूतना मोक्ष’ हे नृत्‍य सादर केले. पूतना राक्षसीण होती; परंतु तिच्‍या मातृत्‍वाचा स्‍थायीभाव ठेवून मी हे नृत्‍य सादर केले. एकच नृत्‍य प्रयोगाचा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी मी ते नृत्‍य दोन वेळा केले. नृत्‍यापूर्वी आणि नृत्‍यानंतर माझा रक्‍तदाब (बी.पी.) आणि त्‍यानंतर ‘युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर’च्‍या माध्‍यमातून माझी सकारात्‍मक आणि नकारात्‍मक ऊर्जेची प्रभावळ मोजण्‍यात आली. त्‍यांनी मला सांगितले, की प्रयोगापूर्वीच्‍या आणि प्रयोगानंतरच्‍या निरीक्षणामध्‍ये पालट येतो. ‘आपल्‍याला प्रयोगातून किती प्रमाणात सकारात्‍मक ऊर्जा मिळाली ?’, याचाही आपण अभ्‍यास करू शकतो.

इ. मी प्रयोगात ‘पूतना मोक्ष’ हे नृत्‍य सादर केले होते. ‘पूतना’ ही राक्षसीण असूनही तिच्‍या मृत्‍यूवर आधारित केलेल्‍या नृत्‍यानंतर आढळून आलेल्‍या निरीक्षणांत माझ्‍या सकारात्‍मक ऊर्जेत वाढ झाली होती. नृत्‍य पहाणार्‍यांवरही सकारात्‍मक परिणाम झाला होता. हे शब्‍दांत सांगणे अतिशय कठीण आहे. ‘नृत्‍य केल्‍यानंतर सकारात्‍मक ऊर्जा मिळते. प्रेक्षकांना आनंद मिळून त्‍यांच्‍यावरही चांगला परिणाम होतो; कारण वातावरणाचाही त्‍यांच्‍यावर परिणाम होतो’, असे आपण केवळ ऐकले आहे; परंतु येथे ते आम्‍ही प्रत्‍यक्ष अनुभवले.                                 (क्रमशः)

– डॉ. सहना भट (भरतनाट्यम् नृत्‍यांगना, नृत्‍यगुरु), संचालिका ‘नाट्यांजली कला केंद्र’, हुब्‍बळ्ळी, कर्नाटक.