‘आजच्या युगात ‘नामजपामुळे व्याधी बरी होते’, यावर सामान्य माणसाचा विश्वास बसणे कठीण आहे, म्हणजे आधी माझाही या गोष्टींवर विश्वास नव्हता. माझे शारीरिक त्रास औषधोपचाराने नव्हे, तर सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजप केल्याने बरे झाले. याविषयी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप थोडा वेळ केल्यावर सर्दी आणि खोकला या त्रासांची तीव्रता न्यून होणे
काही दिवसांपूर्वी मला सर्दी आणि खोकला यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा मी घरगुती औषधोपचार केले आणि चिकित्सालयातून आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधे १० दिवस घेतली, तरीही मला बरे वाटले नाही. योगायोगाने मी काही कामासाठी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोलीत गेलो होतो. तेव्हा ‘मी रुग्णाईत आहे’, असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, असा नामजप करण्यास सांगितला. मी तो नामजप २ दिवस थोडा वेळ केला. माझ्याकडून तो जप फारसा भावपूर्ण होत नव्हता, तरीही मला माझ्या त्रासाची तीव्रता न्यून झाल्याचे लक्षात आले.
२. भावपूर्ण प्रार्थना आणि नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती
अ. माझी नामजपावर थोडी श्रद्धा बसली. त्यानंतर मी जप करण्यापूर्वी देवाला ‘या नामजपामुळे माझा शारीरिक त्रास न्यून होऊ दे’, अशी भावपूर्ण प्रार्थना केली आणि जप करू लागलो. त्या दिवशी माझ्या शारीरिक त्रासाची तीव्रता न्यून होऊन माझा थकवाही उणावला.
आ. दुसर्या दिवशी नामजप करतांना ‘नामजप अधिक भावपूर्ण होत असून आता जपाच्या क्रमाकडे लक्ष द्यावे लागत नसून त्यात सहजता आली आहे’, असे माझ्या लक्षात आले.
इ. त्यानंतर मी सप्तचक्रांकडे लक्ष देण्यास आरंभ केला. नामजपाला बसल्यावर अनुमाने ५ मिनिटांनंतर मला ‘मूलाधारचक्राकडून एक ऊर्जास्रोत वर वर जात आहे आणि माझी छाती अन् कपाळ यांवर उष्णता जाणवत आहे’, असे लक्षात आले. (सर्दीमुळे माझी छाती, कान आणि नाक गच्च झाले होते.) त्यानंतर २ – ३ दिवसांत माझा शारीरिक त्रास पूर्ण बरा झाला.
३. नामजपामुळे पाठदुखी थांबणे
मी एकाच दिवशी अनेक शारीरिक कष्टाची कामे केल्यामुळे माझी पाठ एका विशिष्ट ठिकाणी दुखत होती. तेव्हा सद़्गुरु गाडगीळकाकांनी दिलेला नामजप आणि विशिष्ट मुद्रा केल्यावर दोनच दिवसांत माझी पाठदुखी थांबली.
४. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेे सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांंच्या माध्यमातून नामजपादी उपाय सांगून साधकांचे त्रास न्यून करत आहेत’, असे जाणवणे
सद़्गुरु गाडगीळकाकांना दिवसभर अनेक साधक प्रत्यक्ष भ्रमणभाषवरून नामजपादी उपाय विचारतात. ते प्रत्येकाला न थकता आणि न कंटाळता नामजप सांगतात. त्या वेळी ‘सद़्गुरु गाडगीळकाकांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवच साधकांचे त्रास न्यून होण्यासाठी नामजप सांगून त्यांच्या दुःखावर फुंकर घालत आहेत’, असे मला वाटते. स्थुलातून हे औषध रोगांवरील दिसत असले, तरी ते खर्या अर्थाने ‘प्रारब्धभोगाची तीव्रता न्यून करून साधनेची गोडी वाढवणारे अमृतच आहे’, असे मला वाटते.
‘ही अनुभूती लिहून द्यायची प्रेरणा दिल्याबद्दल मी भगवान श्रीकृष्ण, प.पू. गुरुदेव आणि सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सतारवादक आणि वाद्य अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (२८.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |