आश्रमाच्‍या भूमीतील पाण्‍याची स्‍पंदने शोधण्‍यासाठी नकाशावरून बोट फिरवणे, तेव्‍हा ‘तोंडात लाळ सुटलेल्‍या ठिकाणी भूमीमध्‍ये पाणी आहे’, असे जाणवणे आणि त्‍याच ठिकाणी पाणी असल्‍याचे सिद्ध होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘वाराणसी येथील आश्रमाच्‍या भूमीमध्‍ये विहीर खणण्‍यासाठी ‘तेथील भूमीमध्‍ये पाणी कुठे आहे ?’, हे शोधायचे होते. त्‍यासाठी मला त्‍या जागेचा नकाशा देण्‍यात आला. मी त्‍या नकाशावरून माझे बोट फिरवून भूमीमध्‍ये पाणी असल्‍यास त्‍याची स्‍पंदने बघत होतो. अचानक मला एके ठिकाणी बोट नेल्‍यावर तोंडात लाळ सुटली. तेव्‍हा ‘त्‍या ठिकाणी भूमीत पाणी आहे’, असे माझ्‍या लक्षात आले. मी त्‍या जागेपासून दुसरीकडे बोट नेल्‍यावर मला तोंडात लाळ सुटणे बंद झाले आणि पुन्‍हा त्‍या ठिकाणी बोट नेल्‍यावर माझ्‍या तोंडात लाळ सुटू लागली. मी हा प्रयोग ३ – ४ वेळा केला आणि मला जाणवलेले योग्‍य आहे ना ?’, हे पडताळले. त्‍यानंतर ‘भूमीमध्‍ये पाणी जाणवलेल्‍या भागात किती परिसरात पाणी आहे आणि त्‍याचा केंद्रबिंदू कुठे आहे ?’, हेही मी शोधले अन् त्‍याप्रमाणे नकाशावर ‘पेन्‍सील’ने खूण केली. त्‍या नकाशावर आणखी एके ठिकाणी भूमीमध्‍ये पाणी असल्‍याचे मला जाणवले आणि मी तेथेही खूण केली.

नारळाच्‍या साहाय्‍यानेही भूमीतील पाणी शोधता येते. यासाठी आपल्‍या तळहातावर नारळ ठेवायचा. त्‍याची शेंडी आपल्‍या समोरच्‍या दिशेने करून ठेवायची आणि भूमीवरून हळूहळू चालत जायचे. भूमीत जेथे पाणी असेल, तेथे नारळाची शेंडी आपोआप आकाशाच्‍या दिशेने होते, म्‍हणजे नारळ तळहातावर उभा रहातो. हा प्रयोग वाराणसी आश्रमाच्‍या भूमीमध्‍ये करण्‍यात आला. तेथील भूमीमध्‍ये ज्‍या २ ठिकाणी पाणी असल्‍याचे मला जाणवले होते, त्‍याच २ ठिकाणी गेल्‍यावर नारळ तळहातावर उभा राहिला. यावरून माझे अनुमान योग्‍य असल्‍याचे सिद्ध झाले.’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (८.५.२०२३)