सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी नृत्यकलेशी संबंधित साधिकेला नृत्य करतांना आलेल्या अनुभूती

२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव झाला. या जन्मोत्सवाच्या वेळी निघालेल्या दिंडीत विविध नृत्ये सादर करण्यात आली. या नृत्यात नृत्यकलेशी संबंधित साधिका सहभागी होत्या. जन्मोत्सवानिमित्त झालेल्या दिंडीत या नृत्याच्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग – नृत्यसाधना

१. ‘जन्मोत्सवासाठी साधिकांचे नृत्य बसवायचे आहे’, हा निरोप मिळाल्यावर आनंद होणे अन् ‘देवाच्या कृपेने जी सेवा मिळाली होती ती करायची आहे’, या सहज भावाने त्या सेवेला आरंभ होणे

कु. म्रिणालिनी देवघरे

‘आम्हाला जन्मोत्सवासाठी इतर साधिकांचे नृत्य बसवायचे आहे’, असे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. इतरांना नृत्य शिकवण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळाली होती. नृत्याच्या गटात नृत्यक्षेत्राची माहिती असलेले कुणीही नव्हते; पण ‘देवाच्या कृपेने जी सेवा मिळाली होती, ती करायची आहे’, या सहजभावाने मी सेवेला आरंभ केला.

२. साधिकांना नृत्य शिकवतांना आलेल्या अनुभूती

२ अ. सूक्ष्मातून ‘स्वतः नृत्याच्या पोषाखात परात्पर गुरुदेवांसमोर दिंडीत नृत्य करत आहे’, असे दृश्य दिसणे : सर्व साधिकांचा गाण्यावर नृत्याचा सराव घेत असतांना अकस्मात् माझी भावजागृती झाली. त्या वेळी परात्पर गुरुदेवांची पुष्कळ आठवण येत होती. ‘तेथे साधिका सराव करत आहेत आणि आजूबाजूला कुणी बसले आहे’, याचे मला भान नव्हते. त्या वेळी डोळे मिटल्यावर मला सूक्ष्मातून ‘मी नृत्याचा पोशाख घालून परात्पर गुरुदेवांसमोर दिंडीत नृत्य करत आहे’, असे दृश्य मला दिसले. या दृश्यानेच मला पुष्कळ भरून आले होते. त्या वेळी उत्स्फूर्तपणे मी त्याच गाण्यावर एकटीने नृत्य केल्यावर माझे ध्यान लागले आणि ‘तो क्षण संपूच नये’, असे वाटत होते.

२ आ. ‘व्यापक होण्यासाठी देव घडवत आहे’, असे साधिकेला वाटणे : या दिंडीत ‘प्रत्यक्ष परात्पर गुरुदेव असणार आहेत’, याची मला कल्पना नव्हती. गुरुदेवांनी नृत्य करण्याचा आनंद सूक्ष्मातून आधीच दिल्यामुळे ‘नृत्य देवाच्या चरणी अर्पण झाले’, असे मला जाणवले आणि देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. तेव्हा मनात विचार आला, ‘देव आपल्याला या सेवेच्या माध्यमातून ‘व्यापक कसे व्हायचे ?’, हे शिकवत आहे.’

२ इ. स्वतः काही करत नसून देवच करून घेत असल्याचे जाणवून ते स्वीकारले जाणे : काही वेळा मी माझ्या बहिणीचा (कु. तीर्था देवघरे हिचा (भरतनाट्यम् विशारद)) सराव घेतांना तिच्याकडून नृत्य व्यवस्थित होत नसेल, तर माझी चिडचिड होत असे. माझ्या मनात ‘तिला नीट जमायला हवे’, असे विचार असतात; पण देवाने दिलेल्या या नवीन सेवेच्या वेळी सर्व साधिकांच्या हालचाली चुकत असतांना देवाने मला स्थिर ठेवले. ‘त्यांना नृत्य करतांना नेमकी काय अडचण येत आहे ?’, या संदर्भात त्यांनी सांगितलेली सूत्रे मला ऐकण्याच्या स्थितीत राहून शिकता आली. त्या वेळी माझ्या मनात विचार आला की, ‘मी हे सर्व काहीच करत नाही. मी केवळ माध्यम आहे आणि प्रत्यक्ष देव त्यांना नृत्यातील पालट सांगत आहे. तो सर्व सराव करून घेत आहे’, असे मला जाणवले. ‘तेथे मी नसून प्रत्यक्ष गुरुदेव उपस्थित आहेत आणि ते नृत्याविषयी सांगत आहेत’, असे मला जाणवले.

२ ई. शिकण्याची वृत्ती वाढणे : या सेवेमध्ये देवाने मला शिकण्याच्या स्थितीत ठेवले. ‘व्यापक विचार कसा करायचा ?’, हे शिकवले. आपल्याला काय हवे, त्यापेक्षा देवाला काय अपेक्षित आहे ? इतरांचा विचार कसा वाढवला पाहिजे ? प्रत्येक गोष्ट विचारून केली पाहिजे आणि सेवेतील दायित्व कसे घेतले पाहिजे ?’, हे मला शिकायला मिळाले. गुरुदेवा, त्याबद्दल ईश्वरचरणी कोटीशः कृतज्ञता !

३. ‘नृत्याचा सराव परिपूर्ण केल्यास वातावरणातील स्पंदने पालटतात’, असे जाणवणे

जिथे साधिकांनी सराव केला, तिथे काही क्षण मी उभी राहून पाहिले. त्या वेळी मला ‘तेथे शक्तीची स्पंदने पिवळ्या रंगात अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवले आणि ध्यान लागले. यातून असे शिकायला मिळाले की, ‘सराव करतांना मनाचा पूर्ण सहभाग असायला हवा (नृत्य मनापासून केले पाहिजे.) जे नृत्य करत आहोत, ते परिपूर्ण कसे होऊ शकेल ? याकडे लक्ष द्यायला हवे. त्यामुळे वातावरणातील स्पंदने पालटतात.’

४. नृत्य करणार्‍या साधिकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

४ अ. नृत्य करणार्‍या साधिकांना शिकवतांना मनापासून त्यांनी मी सांगितलेल्या नृत्यातील सुधारणा ऐकणे : साधिकांना शिकवतांना ‘प्रत्येक नृत्यातील मुद्रा आणि हालचाली कशा करायच्या आहेत’, असे स्पष्ट केले जात होते. साधिकांना जिथे जमत नव्हते, तिथे त्यांना सुधारणा सांगितल्या जात होत्या. त्या वेळी साधिका सर्व मनापासून ऐकत होत्या आणि त्यांच्याकडून नृत्य परिपूर्ण करण्याची तळमळ शिकायला मिळाली.

४ आ. ज्या दिवशी सर्वांनी पूर्ण मनापासून नृत्याचा सराव केला, त्या वेळी वातावरणातसुद्धा आनंद जाणवत होता आणि ‘आपण वृंदावनात आलो आहोत’, असे मला जाणवले.’

– कु. म्रिणालिनी देवघरे (भरतनाट्यम् विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक