अकस्मात् मरगळ येऊन उत्साह न्यून होणे आणि आश्रमातील ध्यानमंदिरात जाऊन तेथील तीर्थ असलेल्या कमंडलूला स्पर्श करताच उत्साही वाटून मरगळ, थकवा आणि निरुत्साह नाहीसा होणे

कु. महानंदा पाटील

‘२०.१०.२०२१ या दिवशी मी सायं. ७ वाजता आनंदाने महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी भोजनकक्षात गेले. मी माझ्यासाठी ताटात थोडेच जेवण वाढून घेतले; पण जेवायला आरंभ करताच माझा जेवणातील उत्साह पूर्णपणे न्यून झाला. मला जेवण जात नव्हते. ‘असे एकाएकी काय झाले ?’, तेच मला कळेना. त्यानंतर मला रगळल्यासारखे झाले. आश्रमात प्रतिदिन रात्री ८ वाजता पू. दाभोळकरकाका साधकांसाठी नामजपादी उपाय करतात. मी कशीबशी तिथे उपायांना जाऊन बसले. रात्री ९ वाजता उपाय संपल्यावर माझ्या मनात ‘खोलीत जाऊन झोपावे’, असा विचार आला. खोलीकडे जातांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘मी पुष्कळ रुग्णाईत आहे. माझ्या समवेत ४ – ५ साधिका आहेत. मी एका साधिकेला सांगत आहे, ‘ध्यानमंदिरात जा आणि तेथील  कमंडलूतील तीर्थ मला आणून दे.’

त्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘माझ्या जवळील पाण्याच्या बाटलीत ध्यानमंदिरातील कमंडलूतील तीर्थ घेऊया. रात्री झोपतांना प्यायले, की बरे वाटेल.’ लगेचच मी हळूहळू चालत ध्यानमंदिरात जाऊन प्रभु श्रीरामाच्या चित्रासमोरील तीर्थ असलेला कमंडलू उचलला. तेव्हा मला एकदम ताजेतवाने वाटू लागले. मला आलेला थकवा आणि निरुत्साह निघून गेला. मला उत्साह वाटू लागला. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘सायं. ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत मला झालेला त्रास आध्यात्मिकच होता.’ तेव्हा ‘ध्यानमंदिरातील पूजेच्या प्रत्येक वस्तूमध्ये किती चैतन्य आहे !’, हे माझ्या लक्षात आले. तीर्थ असलेला कमंडलू हातात घेताच कमंडलूतील चैतन्य मला मिळून माझा आध्यात्मिक त्रास थांबला. त्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत मी ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी बसू शकले. त्या वेळी माझ्याकडून प्रभु श्रीरामाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ’

– श्रीरामाची दासी,

कु. महानंदा पाटील (आताची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक