कोल्हापूर – संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असून ३१ मे या दिवशी कोल्हापूर अग्नीशमन विभागाकडून अग्नीशमन, शोध आणि बचाव यांची प्रात्यक्षिके पंचगंगा नदीघाट येथे सादर करण्यात आली. अग्नीशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादी व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर तिला पाण्यातून लाईफ जॅकेट, फायबर इनर आणि दोरच्या साहाय्याने कसे वाचवले जाते, याचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. या प्रसंगी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य अग्नीशमन अधिकारी तानाजी कवाळे यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ‘‘पुराच्या काळात आपत्ती येणार, हे गृहित धरून महापालिका प्रशासन उपाययोजना आणि नियोजन करते. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले स्वच्छता, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक इमारतीवर कारवाई चालू आहे. आपत्ती काळात महापालिकेच्या यंत्रणेसमवेत ‘महाराष्ट्र सोल्जर फोर्स’ हे कोणतीही आपत्ती आली, तर त्याला सामना करण्यासाठी सज्ज आहे.’’