सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब (वय ८२ वर्षे) कोल्हापूर सेवाकेंद्रात करत असलेल्या विविध सेवा !

‘मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ७ वर्षे राहिलो. ४.१२.२०१९ या दिवशी मी  गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने कोल्हापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रात आलो. कोल्हापूर सेवाकेंद्रात आल्यानंतर मार्च २०२३ पर्यंत गुरुमाऊलींनी माझ्याकडून करवून घेतलेल्या विविध सेवा पुढे दिल्या आहेत.

पू. सदाशिव परब

१. सनातनचे ग्रंथ पडताळण्याची सेवा करणे आणि साधकांकडून भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा होण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करून घेणे

मी कोल्हापूर येथील मुद्रणालयातून मुद्रण होऊन आलेले सनातन संस्थेचे ग्रंथ पडताळण्याची सेवा करतो. गुरुदेवांच्या कृपेने मी ही सेवा प्रतिदिन ८ ते ९ घंटे करतो. ‘ग्रंथ पडताळणीचा वेग कसा वाढवावा ? ग्रंथ एकाग्रतेने नामजप करत कसे पडताळावे ?’, हे मी साधकांना समजावून सांगितले. मी साधकांना सेवेचे महत्त्व सांगितले आणि सेवेला येण्याची अन् जाण्याची वेळ लिहिण्यासाठी नोंदवही ठेवली. त्याप्रमाणे साधक त्या नोंदवहीत नोंदी करतात. येणार्‍या आपत्काळात साधकांची लवकरात लवकर आध्यात्मिक प्रगती व्हावी; म्हणून गुरुमाऊलींनी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालू केले. हे साधकांना समजावून सांगितल्यामुळे साधक ग्रंथ तपासणीच्या सेवेला अधिक वेळ देऊ लागले.

२. मी प्रत्येक सोमवारी सेवाकेंद्रातील ८ ते १० साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतो.

३. विविध कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना आणि नामजप करणे

हिंदु राष्ट्र-जागृती सभा, पत्रकार परिषदा, हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मला प्रार्थना करण्यास सांगितले जाते. तेव्हा मी प्रार्थना आणि नामजप करतो. गुरुदेवांच्या कृपेने प्रत्येक वेळी सभा किंवा पत्रकार परिषद यांना चांगला प्रतिसाद मिळतो.

४. साधकांना नामजपादी उपाय शोधण्यास शिकवणे

पुढे येणार्‍या तीव्र आपत्काळाशी सामना करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे ‘प्रत्येक साधकाने नामजपादी उपाय शोधून काढण्याचे प्रयत्न करावेत’, यासाठी मी साधकांना साहाय्य करतो, उदा. प्रथम शरिराभोवतीचे आवरण शोधणे, नंतर ते आवरण ‘टॉवर’ मुद्रा करून काढणे, इत्यादी.

५. साधकांना नामजपादी उपाय सांगणे

आता साधक नामजपादी उपाय शोधण्याचे प्रयत्न करत आहेत. साधकांना ते जमत नसेल, तर मी त्यांना सप्तचक्रांवरील अनिष्ट शक्तीचे स्थान आणि त्यासाठी करावयाची मुद्रा अन् नामजप शोधून देतो. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी मला प्रसारातील साधकांना त्रास झाल्यास नामजप शोधून देण्यास सांगितले आहे.

‘अशा प्रकारे गुरुमाऊली माझ्याकडून सेवा करून घेत आहेत’, याबद्दल मी गुरुमाऊलींच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– (पू.) सदाशिव (भाऊ) परब (वय ८२ वर्षे), कोल्हापूर सेवाकेंद्र (७.४.२०२३)