वन्यजीव मंडळाची ४ वर्षांत एकही बैठक झाली नाही ! – पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर, गोवा

नवीन मंडळाकडे वन्यजीव आणि त्यांचा अधिवास सुरक्षित राखण्याचे दायित्व असल्याचा प्रा. केरकर यांचा दावा

पणजी, २६ मे (वार्ता.) – गोवा राज्य वन्यजीव मंडळाची मागील ३ – ४ वर्षांत एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या वन्यजीव मंडळाकडे वन्यजीव आणि त्यांचा अधिवास सुरक्षित राखण्याचे दायित्व आले आहे. यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर यांनी केले आहे.

राज्यशासनाने नुकतीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ३१ सदस्यीय गोवा राज्य वन्यजीव मंडळाची पुनर्रचना केली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रा. केरकर यांनी हे आवाहन केले आहे.

प्रा. केरकर पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील जंगलांत मोठ्या प्रमाणात वन्यजिवांचा अधिवास आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी नूतन वन्यजीव मंडळाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात वर्ष २००१ ते २०२१ या कालावधीत ५ वाघांचा मृत्यू झाला, ही चिंताजनक गोष्ट आहे. त्यामुळे वन्यजीव मंडळाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

याविषयी वेळोवेळी बैठका घेऊन यावर चर्चा करणे आवश्यक आहे. हल्लीच सुमारे ५ चौ.कि.मी. वनक्षेत्र मानवी हस्तक्षेपामुळे जळून खाक झाले. यामध्ये अनेक वन्यजीव मृत्यूमुखी पडले असावेत, तसेच अन्य वन्यजीव अन्यत्र स्थलांतरित झाले असावेत. यासाठी वन्यजिवांच्या अस्तित्वासाठी मंडळाने सखोल विचार करावा.’’