कोकण रेल्वेचे श्री गणेशचतुर्थीसाठीचे आरक्षण काही मिनिटांतच पूर्ण झाल्याने प्रवाशांमध्ये संताप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रेल्वेमंत्र्यांशी २९ मे या दिवशी बैठक

कणकवली – श्री गणेशचतुर्थीसाठी कोकण रेल्वेने आगाऊ आरक्षण चालू झाल्यावर कोकणात येण्यासाठी आरक्षण करणार्‍या गणेशभक्तांची मोठी असुविधा होत आहे. याची नोंद घेऊन ‘आरक्षण चालू झाल्यावर काही मिनिटांतच ते पूर्ण कसे झाले ?’ याविषयी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे वरिष्ठ अधिकार्‍यांसह २९ मे या दिवशी बैठक घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.

यावर्षी १९ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशचतुर्थी आहे. श्री गणेश चतुर्थी हा कोकणातील सर्वांत मोठा सण असून या सणाला प्रतिवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात येतात. त्यामुळे त्याची सिद्धता काही मास अगोदरच चालू केली जाते. कोकण रेल्वेच्या वतीने १६ मेपासून आरक्षण सुविधा चालू करण्यात आली. आरक्षण चालू झाल्यावर काही मिनिटांतच आरक्षण पूर्ण झाले. त्यामुळे कोकणात येणार्‍या गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. गणेशभक्तांकडून रेल्वेच्या आरक्षणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आणि चौकशीची मागणीही केली जाऊ लागली.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेणार आहेत.

या आरक्षणाविषयी आमदार राणे म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री राणे यांनीही यासाठी पुढाकार घेतला असून रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे निश्चित केले आहे. या बैठकीत योग्य तो निर्णय होऊन कोकणात येणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’’