दगडफेक करणारे धर्मांध आणि सूत्रधार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

जळगाव येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी !

जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

जळगाव – शहरातील सम्राट वसाहत परिसरात मागील सप्ताहात धर्मांधांनी सलग दोन वेळा दडगफेक करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. एका घटनेत गुन्हा नोंद होऊनही दुसर्‍या दिवशी पुन्हा दगडफेक करण्याचे त्यांचे धाडस होतेच कसे ? अकोला, नगर या जिल्ह्यांत नुकत्याच दंगली घडलेल्या असतांना अशा घटना घडवून आणून शहरातील कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करू पहाणार्‍या धर्मांधांवर, तसेच या घटनांमागील सूत्रधारावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जळगाव येथे २३ मे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली.

या आंदोलनाला हिंदु राष्ट्र सेना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री योग वेदांत सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रणरागिणी शाखा आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी आणि हिंदु बांधव उपस्थित होते. या वेळी ‘ही दगडफेक नाही, जिहाद आहे, देशविरोधी आतंकवाद आहे !’, ‘मंदिरावरील दगडफेकीचे प्रकरण दाबू पहाणार्‍या पोलीस प्रशासनाचा निषेध असो !’, ‘दगडफेक करणारे हात ७०-८० जणांचे, गुन्हे नोंदवले केवळ २० जणांवर..’ अशा घोषणा देण्यात आल्या.

एम्.आय.डी.सी. पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांनी दोन्ही प्रकरणांत सम्राट वसाहत परिसरातील महिला आणि पुरुष यांना गुन्हे नोंद करतो, असे सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला, तसेच महादेव मंदिरावरील दगडफेकीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. ‘त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. प्रत्यक्षात ‘१९ मे या दिवशी मंदिरावर झालेल्या दगडफेकीसंदर्भात जिल्ह्यातील गोपनीय विभागांचे अहवाल पडताळल्यास सत्यता आणि गांभीर्य लक्षात येईल’, असेही या वेळी सांगण्यात आले.

या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. नीलेश पाटील म्हणाले की, धर्माधांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा करेन.

हिंदु महासभेचे राज्यअध्यक्ष अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी म्हणाले की, हिंदु जनजागृती सभेमध्ये काहीही चुकीचे किंवा असंवैधानिक बोलले गेले नसतांनाही तथाकथित धर्माधांच्या दबावाखाली येऊन आयोजकांवर गुन्हे नोंद करणे अयोग्य आहे. याकरिता आम्हालाही न्यायालयात जावे लागू शकते.

या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. मोहन तिवारी, संघाचे देवगिरी प्रांत संयोजक श्री. देवेंद्र भावसार, सम्राट नगरातील रहिवासी, पिंटू परदेशी, गणेश चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. भाजपच्या माजी महापौर सौ. सीमा भोळे, तसेच शेकडो हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते.

नसलेले ‘हेट स्पीच’ माथी मारून हिंदूंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍यांची चौकशी करा ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

जळगाव जिल्ह्यात गेली १० वर्षे हिंदूंच्या सभा शांततेत पार पडत आहेत. या सभांच्या माध्यमातून हिंदु समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतांना प्रशासनाला निवेदने देत राहून त्याला भरमसाठ प्रसिद्धी देऊन हिंदूंच्या सभांवर कारवाई करण्याचा दबाव शासन यंत्रणांवर आणणे, हेच मुळात ‘हेट स्पीच’ आहे. त्यामुळे अशा निवेदनकर्त्यांचीच चौकशी करायला हवी.