‘मालवणी’ केवळ बोलीभाषा नसून ती प्रदेशनिष्ठ संस्कृतीची वाहक आहे ! – सतीश लळीत, अध्यक्ष, मालवणी साहित्य संमेलन

शिरोडा येथे ‘मालवणी साहित्य संमेलना’चे आयोजन 

वेंगुर्ला – मालवणी ही केवळ एक मराठीची बोली नसून ती लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, निसर्ग, पर्यावरण, आतिथ्यशीलता, प्राचीन परंपरा आणि चिकित्सकपणा यांचा संगम असलेल्या प्रदेशनिष्ठ संस्कृतीची वाहक आहे. कोकण रेल्वेचे आद्यप्रवर्तक अ.ब. वालावलकर यांनी ‘गीते’चे मालवणीमध्ये भाषांतर केले आहे. यावरून मालवणी ही केवळ उथळ आणि वरवरची बोलीभाषा नसून ‘वेदांत’ समजावून सांगण्याची शक्तीसुद्धा तिच्यात आहे, असे उद्गार ‘मालवणी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी काढले.

आजगाव (तालुका सावंतवाडी) येथील ‘साहित्य प्रेरणा कट्टा’ या संस्थेने शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात ‘मालवणी साहित्य संमेलना’चे आयोजन केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून लळीत बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर संमेलनाचे निमंत्रक तथा ‘साहित्य प्रेरणा कट्टा’चे समन्वयक विनय सौदागर, उद्योजक रघुवीर उपाख्य भाई मंत्री, ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, कार्यवाह सचिन गावडे, कवी रुजारीओ पिंटो आदी उपस्थित होते.

या वेळी लळीत पुढे म्हणाले, ‘‘आधुनिकीकरणाच्या धबडग्यात सगळ्याच प्रादेशिक भाषा आणि विशेषतः बोलीभाषा यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत; परंतु केवळ ‘बोलीभाषा कशा टिकणार?’, अशी चिंता व्यक्त करून काही साध्य होणार नाही. अशा प्रामाणिक हेतूने भरवलेल्या संमेलनामुळेच बोलीभाषा टिकून रहाण्यास खरे साहाय्य होणार आहे. मालवणी बोलीतील लोककथा, लोकगीते, ओव्या, कोडी, म्हणी ही एक फार मोठी मौखिक परंपरा आहे. या परंपरेचे संकलन आणि संशोधन झाले पाहिजे अन्यथा काळाच्या ओघात हा मौल्यवान खजिना नष्ट होऊन जाईल.’’