शहराला वास्को द गामा या दरोडेखोराचे नाव असणे, हा अपमान ! – दिनेश पाटील, राष्ट्रीय बजरंग दल

आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश पाटील

मुरगाव – वास्को द गामा हा दरोडेखोर होता. या दरोडेखोराचे नाव या शहराला दिले असून पोर्तुगीज गेल्यानंतरही आजपर्यंत आपण हे नाव पुसून टाकू शकलो नाही. हा आपल्या हिंदु होण्याचा अपमान असल्याचे मत आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश पाटील यांनी केले. हिंदु नववर्ष स्वागत समिती, शिवशंभू प्रतिष्ठान, मुरगाव उत्सव समिती यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री देव दामोदर मंदिरात श्रीफळ वाहून शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप नगरपालिकेसमोर करण्यात आला. या वेळी दिनेश पाटील प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘गोवा सरकारच्या राजपत्रात २६ नोव्हेंबर १९७० प्रमाणे त्या वेळचे प्रशासक जे.सी. आल्मेदा यांनी शहराचे ‘वास्को-द-गामा’ हे नाव ‘संभाजी’ असे पालटले असतांना सरकार  आणि सरकारमधील सर्व विभाग ‘संभाजी’ हे नाव का वापरत नाहीत. या ठिकाणी समाजावर वास्को-द-गामा नाव थोपण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून चालू असून हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. जोपर्यंत हा कलंक गोव्यातून हद्दपार केला जाणार नाही, तोपर्यंत हिंदु समाज शांत बसणार नाही, हे सरकारने ध्यानात घ्यावे.’’

या वेळी व्यासपिठावर आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, नगरसेवक विनोद किनळेकर, अमेय चोपडेकर, श्रद्धा आमोणकर, उत्सव समितीचे अध्यक्ष संजय नाईक, कार्यक्रमाध्यक्ष मोतीलाल पेडणेकर, संयोजक नितीन फळदेसाई आदी व्यासपिठावर उपस्थित होते.