मुंबईत १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त !

मुंबई – सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरील कारवाईत १ किलो ७८९ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे १८ कोटी रुपये असून या प्रकरणी इमिली कानिनी रोधा या केनियातील महिलेला अटक करण्यात आली आहे. तिला कोकेन देहलीला पोचवायचे होते. त्यासाठी तिला १ लाख केनियन शिलिंग (सुमारे ६६ सहस्र रुपये) देण्याचे आरोपींनी मान्य केले होते. या प्र्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
म्हाडाच्या रहिवाशांना १ रुपयात वैद्यकीय उपचार !
मुंबई – म्हाडाच्या ३४ वसाहतींमधील रहिवाशांना १ रुपयात वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. यात स्वस्त दरातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
मराठी वापरासाठी मनसेचे बँकांना पत्र !
डोंबिवली – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करावा, या आशयाची पत्रे मनसेच्या डोंबिवली शाखेचे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी शहरातील राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना दिली.
१६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या !
अंबरनाथ – पालकांनी भ्रमणभाषवर खेळ खेळण्यास न दिल्याने येथील १६ वर्षीय अमन साहू या इयत्ता १० वीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली.
संपादकीय भूमिका : युवा पिढीतील संयम नष्ट होत असल्याचे दर्शवणारी घटना !
छत्रपती शिवरायांची मूर्ती हटवू न देण्यास पट्टणकोडोलीवासीय ठाम
कोल्हापूर – गुढीपाडव्याच्या दिवशी पट्टणकोडोली गावात पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘यासाठी आवश्यक ती अनुमती घेतली नाही’, असे सांगून प्रशासन याला विरोध करत आहे. प्रशासनाने ही मूर्ती काढून घेण्याचा प्रयत्नही केला; मात्र ग्रामस्थांचा विरोध झाल्याने प्रशासन काही करू शकले नाही. या संदर्भात उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास ‘गावकर्यांना विरोध न करता सर्व अनुमती मिळवून द्या’, असे आदेश दिले आहेत. सध्या गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.